७. स्विकार: आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पहिले पाऊल

 मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट

स्विकार: 

आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पहिले पाऊल


२०१२ मध्ये तो दिवस उजाडला, जेव्हा मला माझ्या दोन्ही किडनींच्या अवस्थेबद्दल समजले.


परमेश्वराच्या कृपेने, आयुष्यात व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक, अशा सर्व बाजूंनी सुख अनुभवत असताना, हा धक्का मिळाला. थोडे दिवस मी त्या धक्क्याने बावरलो होतो. पण, जेव्हा लक्षात आले की, 'पिक्चर अभी बाकी हैं'; तेव्हा ठरवले, उर्वरित पिक्चर धमाल जगायचा..


पुढे चालू....


२०१२ नंतर मी थोडा योग, थोडासा व्यायाम व खूप सारे डायटिंग; यावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणून क्रिएटाइन लेवल मर्यादित राहिला.


पण, किडनींची ट्रिटमेंट सुरु झाल्यानंतर, काही काळानंतर, माझे क्रिएटाईन ४ घ्या वर गेले होते. तेव्हा, सौ. प्रिती आरोलकर, यांनी डायटिशिअन म्हणून अप्रतिम रितीने डायट प्लॅन आखून दिला होता. त्यामुळे माझी क्रिएटाईन लेवल चारवरुन, दोनपर्यंत आली होती. माझ्यावर इलाज करणारे, नेफ्रॉलॉजीस्ट सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. पण नंतर, सौ. प्रिती आरोलकर, त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी स्विकारली. आता त्या फक्त त्या कॅन्सर रुग्णालयातील पेशंट्सना ट्रिटमेंट देतात. त्यांच्याइतकी प्रभावी डायटिशिअन मला आजतागायत भेटली नाही.


पुढे कामाच्या व्यापात, खास करुन ट्रेनिंग टूर्सवर असताना योग व व्यायाम करण्यात दिरंगाई होऊ लागली.


तेव्हा, मी माझ्या कामाचा वाढता व्याप सांभाळत होतो. आणि सुप्रिया, माझी पत्नी, तिची नोकरी सांभाळून, निहारिका व मी, अशा दोघांनाही जपत होती. माझी औषधे व माझे डायट, यावर लक्ष ठेवावे लागत होते.


२००९ व २०१४ च्या निवडणूकांपूर्वी, व्यावसायिक रित्या, निवडणूक जिंकण्यासाठी मनुष्य बळ, मानसिकदृष्ट्या तयार करण्याचे अनेक प्रशिक्षणक्रम घेतले. हा एक वेगळा अनुभव होता. यापूर्वी वैयक्तिक सल्लागार म्हणून काम पाहिले होते.


२०१२ च्या सुरुवातीला मी मुंबई विद्यापीठात, Prasanna NLP Practitioner Certification Course, हा National Federation of Neuro Linguistic Programming USA यांच्यातर्फे अधिकृत ट्रेनिंग कोर्स घेतला.


२०१२ च्या शेवटी Parle Agro या कंपनीचे ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट मला मिळाले.


आनंदाची बाब म्हणजे दरम्यान, National Federation of Neuro Linguistic Programming USA तर्फे जगातील प्रथम दहामध्ये मला, Master Trainer of NLP हा बहुमान प्राप्त झाला. हा बहुमान मला माझ्या कर्तृत्वावर मिळाला होता. त्यात माझ्या प्रसन्न NLPians चा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या 'प्रसन्न NLP Practitioner Certification Course' बद्दल व माझ्या ट्रेनिंग कौशल्याबद्दल दिलेल्या फिडबॅक मुळे मी हा बहुमान प्राप्त करु शकलो.


परमेश्वराची योजना माझ्यासारख्या त्याच्या पामर भक्ताला कळत नाही, पण त्याच्या योजनांवर माझा पूर्ण विश्वास आहे.


१ जून २०१३रोजी, दैनिक मुंबई सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या दैनंदिन सदर मालिकेतील लेखांचे संकलन असलेले, 'मी मुंबईकर' या माझ्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन 'सामना' वृत्तपत्राचे संपादक व खासदार माननीय श्री. संजय राऊत यांच्या हस्ते झाले. सदर पुस्तक मी राजकीय प्रवासात वरिष्ठ मित्र झालेले, मा. विभागप्रमुख श्री. भाऊ कोरगावकर यांच्या पल्लवी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या उपक्रमाला भेट दिले होते. 


परमेश्वराच्या कृपेने, मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली होती तरी मी राहतो, त्या वसाहतीमध्ये मला फार कुणी ओळखत नव्हते. मला माझ्या ओळखीच्या मित्रांकडून एसी हॉल व मिडिया कव्हरेज मिळत होते. तरीही भाऊंनी आमच्याच भागात हॉल घेऊन त्याची, दृष्ट लागावी, इतकी सुंदर सजावट केली होती. भाऊंच्या ओळखीचे अनेक मान्यवर आले होते. त्याबरोबरीने, माझे प्रशिक्षणार्थी असलेले विविध मोठमोठ्या कंपन्यांमधील वरिष्ठ व्यवस्थापक, प्राध्यापक तसेच उद्योजक व पत्रकार मित्र आले होते. त्या सर्वांचा भाऊंनी यथोचित सन्मान केला होता. या माझ्या प्रशिक्षणार्थींनी माझ्याबद्दल जो भरभरुन प्रेम व आदर व्यक्त केला, त्यामुळे माझ्या वसाहतीमध्ये मला चांगली ओळख मिळाली. पहिली आवृत्ती हातोहात संपली. पण मागणी असून सुद्धा मी दुसरी आवृत्ती प्रकाशित करु शकलो नाही.


एका बाजूने माझे, मुंबई विद्यापीठात, स्वयं प्रायोजित ट्रेनिंग प्रोग्राम्स सुरु होते. यामध्ये, मला श्री. मंदार माने व नंतर श्री. राहुल करमरकर व श्री. योगेश पाटील यांची बहुमोल मदत झाली.


तर दुसऱ्या बाजूने कॉर्पोरेट ट्रेनिंगचा व्याप सुद्धा वाढत होता. ट्रेनिंग टूर्सवर असताना, डायट सांभाळणे कठीण जात होते. 


DHL मध्ये व नंतर Godrej Heashy foods and beverages Ltd मध्ये श्री. मिलिंद आपटे यांची खूपच मदत झाली होती.


Godrej Security मध्ये सौ. पल्लवी जोशी व श्री. मंदार माने, या दोघांचीही खूप मदत झाली, अक्षरशः प्रत्येक ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये....


क्रोडा केमिकल्स मध्ये, श्री. प्रतिश कोपरकर व श्री. असीम जोशी, यांनी खूप मदत केली.


पुढे, श्री. प्रतिश कोपरकर यांनी SOLVAY या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट साठी आमंत्रित केले. तेथे गुजरात आणि महाराष्ट्र, येथील त्यांच्या विविध कंपन्यांच्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मी घेतले. सौ. कल्पा कदम या धडाडीच्या एच आर मॅनेजरचे सहकार्य मिळाले. त्यांच्या प्रत्येक कंपनीत, तेथील स्थानिक एच आर मॅनेजर्सनी सुद्धा खूप सहकार्य केले.


सर्व कंपनीज व त्यांचे मदत करणारे व्यवस्थापन आणि अधिकारी यांची नावे विस्ताराच्या भितीने घेऊ शकत नाही, याबद्दल क्षमस्व.


माझे वरिष्ठ मित्र श्री. नितीन पोतदार, यांनी आग्रह केला की, माझ्या पुढच्या पुस्तकाचे प्रकाशन, त्यांच्या 'मॅक्सेल' पुरस्कार  सोहळ्यात व्हायला हवे. त्याप्रमाणे, जून २०१४ मध्ये, दैनिक मुंबई सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध माझ्या सदर मालिकेतील लेखांचे संकलन असलेले व मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, यांनी प्रकाशित केलेले माझे चौथे पुस्तक 'दिशा यशाची' चे प्रकाशन माननीय वरिष्ठ नेते श्री. शरद पवार यांच्या हस्ते, इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मॅक्सेल पुरस्कार सोहळ्यात जवळजवळ ३५०० उद्योजक व मान्यवर उपस्थित होते. परंतु संवादामध्ये थोडा गैरसमज झाल्यामुळे 'दिशा यशाची' पुस्तकाच्या फक्त २५ प्रती उपलब्ध होत्या.

३५०० प्रेक्षकांची मागणी होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही.


यादरम्यान, माहिम येथील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ओपीडीच्या फेऱ्या सुरु होत्या. क्रिएटाईन लेवल ५ पर्यंत जाऊन पोहोचली होती. ओळखीने नवीन नेफ्रॉलॉजीस्ट यांची भेट घेतली. त्यांनी पटकन तोंडावर सांगितले की आता काहीच आशा नाही. तुमच्या दोन्ही किडनी आता उपचारा पलिकडे गेल्या आहेत. त्यांचे मत बरोबर होते, पण पद्धत आमच्या मते बरोबर नव्हती.


२०१२ ते २०१७, मुंबई विद्यापीठात माझे प्रसन्न NLP, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन वर आधारित बिपिन्स अर्थात BPNS [Behavioral Programming through New Systems], टिनेजर्स साठी Transformation with Prasanna NLP, असे विविध प्रशिक्षणक्रम सुरु होते. या प्रशिक्षण सत्रांच्या आयोजनात श्री. राहुल करमरकर यांची मोलाची साथ होती. ॲडमिशन पासून ते आयोजनामध्ये, राहुल यांचा सिंहाचा वाटा होता.


८ जुलै २०१६ रोजी, 'साई प्रसन्न फाऊंडेशन' सदस्यांनी 'संवादाचा सोहळा' हा संवादाचे महत्व अधोरेखित करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख मार्गदर्शक होते, माननीय उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई व मा. केंद्रिय मंत्री आणि माननीय खासदार श्री. अरविंद सावंत! त्यांच्या बरोबर दैनिक लोकमत मुंबईचे संपादक श्री. विनायक पत्रुडकर, व्यवस्थापन तज्ञ श्री. अशोक शर्मा, उद्योजक श्री. अण्णासाहेब तांबोसकर व श्री. आशीष पेडणेकर (मा. अध्यक्ष MACCIA) उपस्थित होते.


सदर सोहळ्याचे औचित्य साधून, दैनिक मुंबई लोकमत मध्ये प्रकाशित, माझ्या सदर मालिकेतील लेखांचे संकलन असलेले'ट्रिटमेंट संवादाची' या पुस्तकाचे माननीय उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.


'साई प्रसन्न फाऊंडेशन' तर्फे सौ. अनुराधा गोरे, ॲडवोकेट सौ. नयना परदेशी, यांचे, तसेच 'प्रसन्न' तर्फे विविध मार्गदर्शनपर व्याख्याने मोफत आयोजित करण्यात आली होती. दर दिवाळी, ही 'युवा' संस्थेचा उपक्रमात सहभागी असलेल्या, फूटपाथवर राहणाऱ्या गरीब मुलांसोबत साजरी करत, आम्ही प्रसन्न त्या मुलांच्या सानिध्यात मनाने श्रीमंत होत होतो. अनेक प्रसन्न, मित्रमंडळी व शुभचिंतक, यासाठी आर्थिक हातभार लावत असत व अनेक जण प्रत्यक्ष उपस्थित राहत होते.


२०१७ मध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक क्षण आला. National Federation of Neuro Linguistic Programming USA तर्फे जगातील प्रथम तीनपैकी एक व भारतातील प्रथम NLP GOLD MASTER Trainer म्हणून बहुमान प्रदान करण्यात आला.


१० नोव्हेंबर २०१७ रोजी, 'प्रसन्न परिवार' मधील सदस्यांनी, 'प्रोत्साहन' हा श्री. सदानंद दाते व श्री. नितीन पोतदार यांचे अनमोल मार्गदर्शन व त्यात माझी NFNLP तर्फे भारतातील प्रथम NLP Gold Master Trainer निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित केला होता. साडेआठ पर्यंत असलेले मार्गदर्शन इतके प्रभावी होते की, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव, दहा वाजेपर्यंत ते सुरु होते.


२०१७ मध्ये मला एक हाडाची एच आर तज्ञ असलेली व माणुसकी असलेली व्यक्ती भेटली, श्री. देवेंद्र पालव.. मला डाऊ केमिकल्स' या नामवंत कंपनीच्या दमण व नवी मुंबई येथील कंपनीज साठी ट्रेनिंग प्रोजेक्ट्स करण्याची संधी मिळाली. आणि श्री. देवेंद्र पालव यांची मैत्री लाभली. 


मी माझ्या इतर उपक्रमांसह, ऑगस्ट २०१८ पर्यंत सक्रिय होतो. पण नंतर तब्येत तितकी चांगली राहिली नाही. घरगुती गणेशोत्सवात माझा सहभाग केवळ उपस्थितीपुरता होता. दहीहंडीपासून मी होमिओपॅथी औषध सुरु केले होते. दर दहा मिनिटांनी त्या गोळ्या घ्यायच्या होत्या. माझी नात पूर्ती ही सतत माझ्या गोळ्या घेण्याबाबत सजग होती. तिला साथ द्यायला माझी पुतणी युक्ता होतीच. माझ्या मुलीचे, माझ्या डायटवर कडक लक्ष होतेच. 


त्याच दिवसांत, माझी पत्नी सुप्रियाला, मार्केटमध्ये, डॉ. सुचित्रा नाडकर्णी भेटल्या. रात्री त्या व त्यांचे पती (जे प्रसन्न सुद्धा आहेत) डॉ. जयंत नाडकर्णी, घरी भेटायला आले. डॉ. जयंत व सुचित्रा नाडकर्णी, या दोघांनीही आम्हाला, ॲलोपथी सुरु ठेवून डॉक्टरांची म्हणजेच नेफ्रॉलॉजीस्ट यांची त्वरित भेट घेण्यासाठी सांगितले. त्यांचे प्रेम, काळजी व सल्ला; यामुळे पुढचे माझे इलाज होऊ शकले. आम्ही त्या दोघांचेही ऋणी आहोत.


माझ्या भावासम पुतण्याच्या, मिलिंदच्या ५०व्या वाढदिवसाला सुद्धा मी जाऊ शकलो नाही. २५ सप्टेंबर २०१८ ला रात्री मला ताप आला. पॅरासिटामॉलने सुद्धा ताप उतरत नव्हता. २६ सप्टेंबरला सुप्रियाने माहिम येथील माझे उपचार सुरु असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन केला. फोनवर असलेल्या महिलेने ॲडमिट व्हायला सांगितले. आम्ही रात्री जेव्हा पोहोचलो, तेव्हा आम्हाला एकही बेड रिकामा नसल्याचे सांगितले गेले. आम्ही परत घरी आलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मुंबईतील प्रथितयश सरकारी हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या नेफ्रॉलॉजीस्ट यांची भेट घेतली. त्यांनी दिड तास पूर्वीपासूनच्या सर्व फाईल्स तपासल्या व माझा गैरसमज दूर केला. आतापर्यंत मी समजत होतो, ब्लड प्रेशर मुळे किडनी खराब झाल्या. पण त्यांनी दाखवून दिले की खराब होत गेलेल्या किडनीमुळे, ब्लड प्रेशर वाढत गेले होते. पण त्यांनी कुठेही माझ्यावर पूर्वी उपचार करत असलेल्या जनरल प्रॅक्टिशनरना दोष दिला नाही.


आमच्या विभागातील, अनेक जणांना त्याच डॉक्टरांनी त्यांच्या क्षमतेनुसार चांगले उपचार दिले होते. पण माझ्या बाबतीत, त्या जनरल प्रॅक्टिशनर यांचे दुर्लक्ष झाले होते. 


२७ सप्टेंबरला आम्ही माहिम येथील त्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी निघालो. आमचे कौटुंबिक वरिष्ठ मित्र श्री. भाऊ कोरगावकर व श्री. जयदीप हांडे, हे दोघेही हे समजताच  मला त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेले. भाऊंनी तोपर्यंत फोन करुन त्यांच्या एका परिचित व्यक्तीला बेड बुक करुन ठेवायला सांगितले.


मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत दोघेही, माझ्या कुटुंबियांसमवेत थांबले होते. मला मुख्य इमारतीच्या बाजूला, थोड्या दूर असलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये बेड मिळाला होता. त्या रात्री मिळालेला नर्सेसचा अनुभव खूप वेगळा होता.


क्रमशः


आपलाच,

बिपिन मयेकर

Comments

Popular posts from this blog

विशेष विनंती:

प्रस्तावना

३. फ्लॅशबॅक