प्रस्तावना
प्रस्तावना
डॉक्टर असलेले डॉ. लालचंद शहा यांच्यामुळे, 'डॉक्टर म्हणजे देव !' हा समज बालमनावर ठसत गेला होता. डॉ. शहा आमचे केवळ कौटुंबिक डॉक्टर नव्हते तर कौटुंबिक मित्र होते व आहेत.
आमच्या जुन्या घरापासून त्यांचा दवाखाना पाच मिनिटांच्या अंतरावर होता. सतत दाढीमिशी सफाचट केलेले (आजही) उंचेपुरे, गोरेपान व सतत हसतमुख अशा डॉ. शहांना पाहून आजार अर्धा बरा व्हायचा.
सर्दी, खोकला व ताप असे आजार असतील, तर आम्हाला तेव्हापासून आजही खात्री असते की डॉक्टरांच्या औषधांनी आम्ही एका दिवसात बरे होणार व होतो सुद्धा! मग तो प्लासिबो इफेक्ट असेल किंवा काहीही! आमचा डॉक्टरांवर विश्वास होता व आहे.
डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर मस्त गप्पा मारायचे व आजही आमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बाबींची चर्चा करतात, विचारपूस करतात. जास्त गरज लागली तर त्यांना घरी बोलवावे लागे. ते सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता घरी येत. जो कुणी आजारी असेल त्याची नीट विचारपूस करुन औषध देत व परिवारातील सगळ्यांची चौकशी करत (आजही करतात. फक्त वयपरत्वे व सद्यस्थितीत घरी येऊ शकत नाही). हाच अनुभव आमच्या जुन्या इमारतीमधील व वसाहतीमधील बहुतेकांचा आहे. पैसा आमच्या नात्यामध्ये नेहमीच दुय्यम स्थानावर होता व आहे. नवरात्र तसेच गणपतीमध्ये डॉक्टर त्यांच्या पत्नीसह आमच्याकडे येत. त्यांनी आमच्या आईला नेहमीच स्वतःच्या आईसारखा आदर दिला. त्यामुळे आमच्या हृदयात त्यांचे स्थान अधिक अढळ होत गेले.
लहानपणापासून आपला स्वभाव घडायला सुरुवात होते. आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांनी व संवादांनी आपली मते तयार व्हायला लागतात. यांना अनुभवांची साथ मिळाली की मग हळूहळू समज तयार होत जातो. त्यातील काही समजूतींचे खात्रीमध्ये रुपांतर होत जाते. अशीच लहानपणापासून निर्माण झालेली खात्री होती,
'डॉक्टर म्हणजे देव !'
आजही डॉक्टरांबद्दलचा आदर कायम आहे. फक्त मागील काही वर्षांपासून प्रत्येक डॉक्टरांबद्दल त्या देवपणाची खात्री देता येत नाही. आता प्रत्येक डॉक्टरना देव समजत नाही, तर त्यातील योग्य डॉक्टरांना 'देवमाणूस' समजतो व त्या अनुषंगाने मान देतो. आजच्या युगातही, आपल्या रुग्णांची पूर्ण काळजी घेणारे अनेक प्रोफेशनल डॉक्टर्स आहेत.
मी परत एकदा नमूद करु इच्छितो की, जशा मला बेफिकीर व जबाबदारी टाळणाऱ्या व्यक्ती भेटल्या. त्यातील काही जणांमुळे आभाळाला भोज्जा करण्यापर्यंत वा आता बास झालं, या टोकाच्या विचारांपर्यंत नेणाऱ्या वेदना अनुभवाव्या लागल्या होत्या; त्याचप्रमाणे मला जीवनदान देण्यासाठी झटलेले व आजही झटणारे डॉक्टर्स व इतर स्टाफ मेंबर्स आहेत. वेळोवेळी, मी त्यांचा उल्लेख करणार आहे.
वास्तववादी विवेकी विचारसरणी नुसार आपण कोणत्याही विचाराचे सार्वत्रिकीकरण (जनरलायझेशन) करतो, तेव्हा आपण अवास्तववादी होतो. त्यामुळे मला वाचक बंधूभगिनींना विनंती करायची आहे की, वाचताना डॉक्टर, वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, नातेसंबंध अशा कोणत्याही व्यक्ती किंवा विचाराला सार्वत्रिकीकरण करुन तोलण्याऐवजी, त्या बाबींचे तात्कालिक स्वरुप लक्षात घ्यावे.
आपलाच,
बिपिन मयेकर
myself.bipin@yahoo.co.in
Comments
Post a Comment