३. फ्लॅशबॅक
मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट
मला गंभीर स्वरूपाचे डिहायड्रेशन झाले होते, त्यावेळेस आमचे फॅमिली डॉक्टर शहा यांनी मला चेंबूरला एक जनरल फिजिशियन आहेत त्यांच्याकडे पाठवले होते. गोरेगोमटे, थोडे स्थूल असलेले व चेहऱ्यावर हास्य असलेले ते डॉक्टर पहिल्या भेटीत आवडले.
त्यांनी मला ॲडमिट न करुन घेता, औषधे गोळ्या दिल्या. त्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच अतिशय बरे वाटले. त्यांच्यावरचा विश्वास वाढला. ते जनरल फिजिशियन असलेले डॉक्टर, वागायला-बोलायला सुद्धा अतिशय चांगले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर रॅपो जुळला. मग त्यांच्याकडे घरातील कुणाच्याही आजारानिमित्त जाणे-येणे वाढले.
नंतर मी कल्याणला शिफ्ट झालो होतो आणि एकदा तापावर औषधे घेण्यास गेलो होतो. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन, मी कल्याणला माझ्या घरी गेलो आणि गोळ्या घ्यायला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी गोळ्या घेतल्या आणि नंतर माझ्या शिश्नावर लाल चट्टे उमटले. माझ्या लक्षात नाही आले, की हे गोळ्यांमुळे होते आहे. परत दुसऱ्या दिवशी मी गोळ्या घेतल्या. तेव्हा शिश्नाच्या आजुबाजूची कातडी फाटायला लागली. तिसऱ्या दिवशी गोळ्या घेतल्या. आणि नंतर त्या फाटलेल्या कातडीतून रक्त बाहेर येऊ लागले. लघवी करताना असह्य वेदना होत होत होत्या.
त्या सुमारास माझे दादर येथे प्रशिक्षण सत्र होत माझे सहाय्यक असलेले दोघेजण मला कल्याण येथे घ्यायला आले. अनेक जणांनी, मला ते सत्र रद्द करण्यास सांगितले होते. पण माझ्या तत्वानुसार मी तयार नव्हतो. कसाबसा लिफ्टमधून टॉपफ्लोअर वरुन खाली आलो. रिक्षात बसलो. स्टेशनवर गेलो. दोघांनी मला दोन बाजूने धरून हळूहळू ट्रेनमध्ये बसवले. प्लॅटफॉर्म रस्त्याला लागूनच होता. त्यामुळे ते जमले.
परंतु दादरला उतरल्यावर, जीना चढून जाऊन, अख्खा ब्रिज क्रॉस करुन, परत पायऱ्या उतरायच्या होत्या. त्यावेळेस मात्र प्रचंड त्रास झाला. तिथून टॅक्सी करुन, आम्ही हॉलवर पोहोचलो. तिथे परत पायर्या चढून, दुसऱ्या मजल्यावर गेलो. चार तासाचे सत्र मी खुर्चीवर बसूनच घेतले. माझ्या मांडीवर, मी नॅपकिन ठेवला होता. मधल्या ब्रेकच्या वेळेस सुद्धा, मी उठलो नाही. कारण माझा लेंगा रक्ताने पूर्णपणे भिजलेला होता. आणि मला सहानुभूती नको होती.
सत्र संपल्यानंतर जेव्हा सर्व प्रशिक्षणार्थी निघून गेले. त्यानंतर मी लघवी करण्यासाठी उठलो. लघवी करताना मी ओरडत होतो. त्यानंतर माझ्या दोन्ही सहाय्यकांनी मला परत कल्याणला घरी येऊन सोडले. प्रशांतला मी मनापासून धन्यवाद दिले व आताही देत आहे; कारण त्याने मला नेताना व आणताना खूप जपले होते.
त्यानंतर, मी कल्याण येथील डॉक्टर शेट्टी यांना भेटण्यास गेलो. त्यांनी नीट तपासल्यानंतर मला खूप प्रश्न विचारले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गोळ्या सुरु झाल्यानंतर हा त्रास सुरू झाला आहे. त्यांनी गोळ्या मागवून घेतल्या. आणि गोळ्या बघितल्यानंतर, त्यांनी डोक्याला हात लावला. त्यांच्या मते गोळ्यांमध्ये सल्फा होते व मला सल्फाची अलर्जी होती. त्यांनी मला ताबडतोब त्या गोळ्या बंद करण्यास सांगितले. आणि मला दुसऱ्या दिवशी बोलावले. त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी ते माझ्या शिश्नाच्या वरची कातडी, छोटेसे ऑपरेशन करुन काढून टाकणार होते.
मला ते कसेतरी वाटले. मग घरी जाताना काही सामुग्री विकत घेतली. घरी गेल्यानंतर बाथरुम मध्ये गेलो व अँटी सेप्टीक, नॅपकिन, कापसाचे गोळे व हॅंड ग्लोव्हज माझ्या बरोबर घेतले होते.
बाहेर आवाज जाऊ नये म्हणून मी माझ्या तोंडात नॅपकिन कोंबला आणि हळूहळू शिश्नाच्या वर साठलेले रक्त व पू, साफ करू लागलो. प्रचंड वेदना होत होत्या. पण मी अगोदरच ठरविल्याप्रमाणे, सीमेवर असणाऱ्या सैनिकांना आठवत होतो. तिथे सीमेवर जवानांना गोळी लागते. आणि युद्ध चालू असताना कित्येकदा त्यांना हलवता येत नाही. अशा वेळेस आपले जवान कसे काय वेदना सहन करत असतील, हे चित्र मी डोळ्यासमोर आणत होतो. त्या जवानांना आदर्श ठेवत, पुढील एक तासात मी संपूर्ण साफसफाई केली. नंतर रक्ताने भरलेले कापसाचे गोळे व ग्लोव्हज, मी पिशवीत टाकून, बाहेर कोणालाही न कळता ते केराच्या टोपलीत (डस्टबिन) मध्ये टाकून दिले. नंतर दिवसभर मी ॲंटीसेप्टिक अत्यंत थोड्या प्रमाणात टाकून तयार केलेले पाणी, हळूहळू शिश्नावर शिंपडत होतो.
त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी डॉक्टर शेट्टी यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी तपासणी केल्यावर डोक्याला हात लावला. ते म्हणाले "तू पूर्णपणे वेडा आहेस. हां, पण एक खरे, आता काल मी सांगितलेली प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. दोन-चार दिवसात ही जखम भरून निघेल." त्यासाठी त्यांनी मला एक ॲंटीसेप्टिक क्रीम दिले.
जेव्हा मी एक आठवड्यानंतर, चेंबूरला त्या जनरल फिजिशियन डॉक्टर यांना भेटायला गेलो, तेव्हा ते सुद्धा वैतागले. त्यांना सुद्धा कल्पना नव्हती की मला सल्फाची अलर्जी आहे. पण मला सुद्धा कल्पना नव्हती. त्याच्यामुळे दोष कोणाचाच नव्हता.
पुढे चालू...
आपलाच,
बिपिन मयेकर
नंतर काळजी करण्यापेक्षा, आता काळजी घ्या.
Comments
Post a Comment