६. नाण्याच्या दोन बाजू

 मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट

१९९६ ते २०१२ व तद्नंतर २०१२ ते २०१८, हा कालावधी माझ्या व्यावसायिक यशासाठी खूपच महत्वाचा आहे. या कालावधीत मी पराकोटीचे यश व अपयश, दोन्ही पाहिले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यातील सर्वात मोठा दुःखाचा क्षण, जो आयुष्यभरासाठी चटका देऊन गेला, तो सुद्धा याच कालावधीत अनुभवला होता.


सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, २०१२ पर्यंत, सर्व काही सुरळीत चालले आहे. यामुळेच कधी डॉक्टरांचा दुसरा पर्याय शोधावा, असा विचार सुद्धा मनाला स्पर्श करुन गेला नाही.


१९९८_९९ मध्ये, नोकरी सोडल्यानंतर, हळूहळू 'प्रसन्न प्रशिक्षणक्रम' बॅचेसची संख्या वाढत गेली. सुरुवातीला प्रसन्न प्रशिक्षणक्रमाची रविवारी फक्त एक बस होती. मग हळूहळू दर रविवारी दोन, मग शनिवार-रविवार म्हणून तीन, मग आठवड्यात पाच, नंतर सहा व शेवटी आठवड्याला सात बॅचेस सुरु झाल्या. 


हा पसारा वाढत असताना माझे मित्र प्रसन्न श्री. संदेश आचरेकर यांनी मला मोरारजी मेल्स मध्ये व्हाईस प्रेसिडेंट लेव्हलला 'स्ट्रेस मॅनेजमेंट' हा दोन दिवसाचा कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याची संधी दिली. 


त्यानंतर श्रीयुत राजन महाडिक यांनी मला नरिमन पॉईंट येथील, ओबेरॉय हॉटेलमध्ये संपूर्ण स्टाफचे (जवळजवळ १४००) ट्रेनिंग घेण्यासाठी, Human Resources डिपार्टमेंटशी ओळख करुन दिली. Pilot ट्रेनिंग प्रोग्राम इतका प्रभावी ठरला की, पुढील प्रोग्राम्समध्ये नाव नोंदणीसाठी सर्व स्टाफ मध्ये चढाओढ लागली.


 त्यानंतर ओबेरॉय हॉटेल बरोबर माझे नाते जुळले. तेथे २०१४ पर्यंत मी विविध प्रकारचे प्रशिक्षण प्रोजेक्ट केले. तेथील कर्मचाऱ्यांनी सुद्धा मला खूप प्रेम व आदर दिला, जो मी आयुष्यात विसरू शकत नाही. श्री. ग्यान नागपाल, यांच्यासारखे, प्रभावी मित्र मला लाभले. एच आर मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले श्री. ग्यान नागपाल [CEO and Principal at PeopleLENS Global Associates] आज आंतरराष्ट्रीय किर्तीचे सल्लागार म्हणून सिंगापूर येथे कार्यरत आहेत. ते भारतात आले व ओबेरॉय हॉटेलमध्ये आले आणि त्यांना समजले की, माझा ट्रेनिंग प्रोग्राम सुरु आहे, तर ते परवानगी घेऊन, ते कॉन्फरन्स हॉलमध्ये येऊन प्रेमाने मिठी मारुन व दोन क्षण गप्पा मारुन (प्रशिक्षणार्थींची माफी मागून) निघून जात.


*'यश मिळवल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवर कसे ठेवावे'*, हे मी त्यांच्याकडून शिकलो.


परमेश्वराच्या कृपेने जसा प्रसन्न प्रशिक्षणक्रमाचा विस्तार होत होता, तसाच माझ्या कॉर्पोरेट ट्रेनिंग व्यवसायाचा सुद्धा विस्तार होत होता. हळूहळू मोठ्या कंपन्या माझ्या क्लायंट्स होऊ लागल्या होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला कोणतेही मार्केटिंग करावे लागत नव्हते. विविध कंपन्यांच्या एच आर डायरेक्टर्स व मॅनेजर्स मध्ये आपापसात माझ्या कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या सकारात्मक व प्रभावी परिणामांबद्दल चर्चा होत होती. मी मला मदत करणाऱ्या समस्त एच आर डायरेक्टर्स व मॅनेजर्सचे मनापासून आभार मानतो.


लक्षात घ्या, मला तब्येतीचा कुठेही मोठा अडथळा जाणवत नव्हता.


यादरम्यान, माझ्या आयुष्यात घडलेला सर्वात दुःखद प्रसंग म्हणजे, ऐन गणेशोत्सवात, गौरी पूजनाच्या दिवशीच १९ सप्टेंबर २००७, रोजी माझ्या आईचे निधन झाले. त्या दिवशी दर वर्षी आमच्याकडे श्रीसत्यनारायणाची पूजा असे. हजारों माणसे, संध्याकाळी तीर्थप्रसाद घेण्यासाठी येत असत. आईने नैवेद्याचा प्रसाद केला व थोडा वेळ झोपते, म्हणून ती झोपली. आणि ती गणेशमूर्ती घरात असताना, त्यांच्या साक्षीने, तिने त्या झोपेतच शांतपणे देह ठेवला.


आज माझ्यामध्ये जो काही चांगुलपणा असेल तर त्याचे सर्व श्रेय माझ्या आईला मी देतो. आई लहानपणी जेवण भरविताना विविध संस्कारमय गोष्टी सांगत असे. आज माझ्या सर्व प्रशिक्षणक्रमात व माझ्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमध्ये, आपल्याला त्यातील संदेशाला महत्वाचा आधार देणाऱ्या गोष्टी आढळतील.


ओबेरॉय हॉटेल, मोरारजी मिल्स, लार्सन ॲंड टूब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, इप्का लॅबोरेटरीज, गोदरेज, अशा दिग्गज कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम्स सुरु होत गेले.


दरम्यान, स्व. श्री. व. पु. काळे व श्री. द्वारकानाथ संझगिरी; या दोन्ही दिग्गजांच्या उपस्थितीत माझी ऑडिओ कॅसेट 'प्रसन्नता'चे प्रकाशन झाले. पुढे 'प्रसन्नता' नावाने मी काही टॉक शो आयोजित केले होते.


२००९ मध्ये, एक अभ्यासू व संवेदनशील नेतृत्व श्री. अरविंद सावंत यांच्याबरोबर, माझी ओळख श्री. मारुती साळुंखे यांनी करुन दिली. याअगोदरच मी राजकीय सल्लागार म्हणून कामाला सुरुवात केली होती. पण, इतर कुणाशीही जी मैत्रीची भट्टी जमली नव्हती, ती श्री. अरविंद सावंत यांच्याबरोबर जमली. आम्ही दोघेही चवीचे खाण्याचे व गप्पा मारण्याचे शौकीन.. त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या आणि वैयक्तिक दृष्ट्या, पुणे दौरा यश व आनंद देऊन गेला. नंतर शिवसेना पक्षाबरोबर केलेल्या व्यावसायिक कामामुळे, श्री. गजानन किर्तीकर तसेच श्री. अनिल देसाई यांच्याशी ओळख झाली. स्थानिक लोकाधिकार समितीचे माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, कारण मला माझी नोकरी मिळवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभले होते.


त्याचदरम्यान माझी श्री. संजीव लाटकर, यांच्याशी, रानडे भगिनींनी ओळख करुन दिली. श्री. संजीव लाटकर यांनी मला दैनिक लोकमत मध्ये दैनिक सदर लिहिण्याची संधी दिली. तसेच कमी शब्दांत प्रभावी सदर लिहिण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मी आजतागायत; दैनिक सकाळ मुंबई, दैनिक महाराष्ट्र टाइम्स मुंबई, विवेक साप्ताहिक, व परत दैनिक लोकमत अशा विविध वृत्तपत्रांत व साप्ताहिकांमध्ये, एकंदरीत नऊ सदर मालिका लिहिल्या.


त्यातील दैनिक सकाळ मुंबई मध्ये प्रकाशित व प्रचंड गाजलेली माझी सदर मालिकेचे पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचे ठरले. यात सुद्धा श्री. संजीव लाटकर यांनी मोलाची साथ दिली होती.


२४ जुलै २०१० रोजी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस प्रकाशित, माझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या 'दॅट्स लाईफ' प्रथम आवृत्तीचे प्रकाशन, तात्कालिन माननीय आमदार व आजचे खासदार

श्री. गजानन किर्तीकर आणि आंतरराष्ट्रीय अंध खेळाडू श्री. स्वप्नील शहा; या दोघांचे हस्ते झाले. त्या शुभ प्रसंगी, तात्कालिन आमदार व आजचे माननीय खासदार मा. केंद्रीय मंत्री श्री. अरविंद सावंत, तात्कालिन संपादक दैनिक मुंबई सकाळ श्री. पद्मभूषण देशपांडे, आजचे माननीय पोलीस कमिशनर मीरारोड-भाईंदर श्री. सदानंद दाते, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे श्री. अशोक कोठावळे, मा. विभागप्रमुख कुर्ला+ विभाग व आजचे नगर संपर्क प्रमुख श्री. भाऊ कोरगावकर तसेच श्री. संजीव लाटकर हजर होते. 


जानेवारी २०११ मध्ये, 'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस' यांनी 'दॅट्स लाईफ' पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.


यादरम्यान, मुंबई पोलीस दलासाठी, विविध स्तरांवर आवश्यक प्रशिक्षण व्याख्याने घेण्याची संधी मिळाली.


१९९७ ते २०१२ यादरम्यान, सर्व बाजूंनी मी सर्व स्तरांवर; व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक योगदान, वाचन_लेखन व आध्यात्मिक बाजू; सक्रिय होतो. आणि तब्येत सुद्धा व्यवस्थित होती.


२०११ मध्ये आम्ही आमच्या दोन बेडरुम व हॉल अधिक देव्हाऱ्याची खोली असलेल्या फ्लॅट मध्ये गृहप्रवेश केला. आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिथेही शिवसेना सचिव श्री. अनिल देसाई यांची मोलाची मदत मिळाली होती.


पण २०१२ मध्ये तो दिवस उजाडला, जेव्हा मला माझ्या दोन्ही किडनींच्या अवस्थेबद्दल समजले.


परमेश्वराच्या कृपेने, आयुष्यात व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक, अशा सर्व बाजूंनी सुख अनुभवत असताना, हा धक्का मिळाला. थोडे दिवस मी त्या धक्क्याने बावरलो होतो. पण, जेव्हा लक्षात आले की, 'पिक्चर अभी बाकी हैं'; तेव्हा ठरवले, उर्वरित पिक्चर धमाल जगायचा..


क्रमशः

Comments

Popular posts from this blog

विशेष विनंती:

प्रस्तावना

३. फ्लॅशबॅक