५. अज्ञानात सुख असते?
II श्री साईनाथाय नमः II
१९९७ ते २०१२ या काळात माझी किडनी आतून हळूहळू खराब होत होती. पण मला त्याची कल्पना नव्हती. मी त्या बाबतीत अज्ञानी होतो. म्हणजे खरोखरच दरवेळी,अज्ञानात सुख असते का? उलट जर मला त्यावेळेस कळले असते, तर मी त्यावर योग्य उपचार करवून घेतले असते. माझा यशाचा आलेख जो या काळात वर वर जात होता, त्यात थोडासा वेग कमी झाला असता. पण नंतर जास्त वेगाने मला पुढे जाता आलं असते.
१९९७ ते २०१२, हा काळ माझ्यासाठी कौटुंबिक दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या; तसेच ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय चांगला होता. १९९७ मध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर, जे काही दिवस मी घरी होतो; ते दिवस मी कुटुंबासमवेत आरामात घालवले. त्याच दिवसात, अचानक एक दिवस माझा श्री. मित्र प्रकाश राठोड घरी येऊन थडकला. तो आल्यानंतर, मी बेडवर झोपलो होतो; तिथे येऊन बसला व माझ्याशी थोडावेळ बोलला. मग किचनमध्ये जाऊन त्याने सुप्रियाला बाहेर काढले आणि मग माझ्यासाठी तो फ्रेश चिकन घेऊन आला होता, त्याचे त्याने चिकन सूप बनवले. सूप झाल्यानंतर थोडेसे थंड होऊ दिले आणि नंतर एका बोलमध्ये घेऊन माझ्या बेडजवळ येऊन मला चमचा चमचा अलगद भरवले. आणि तो जितक्या वेगाने आला होता, तितक्याच वेगाने तो निघून सुद्धा गेला. मी आणि सुप्रिया कित्येक वेळ त्याच्या या आपुलकीने भरलेल्या कृतीने भारावलेले होतो. आजही आठवण काढली की मन भरुन येते व चेहऱ्यावर हास्य येते.
श्री साईबाबांच्या कृपेने व आईच्या आशीर्वादाने, १० नोव्हेंबर १९९६ रोजी मी 'प्रसन्न प्रशिक्षणक्रमा'ची सुरुवात केली होती. सामाजिक दृष्टिकोनातून सुरु केलेली, प्रथम बॅच ही ओळखीच्या व्यक्तींमधूनच भरलेली होती. त्याच्यामध्ये माझा लहान भाऊ सचिन याचे मित्र मैत्रिणी तसेच माझी पत्नी सुप्रिया हिच्या परिचित व्यक्ती होत्या. नंतर पुढची बॅच सुद्धा मी नेहरुनगर कुर्ला येथे घेतली. पण नंतर मागणी वाढायला लागल्यानंतर, 'छबिलदास शाळा' दादर येथे प्रशिक्षणक्रम सुरु केले. तिथे काही बॅचेस झाल्यानंतर, 'प्रसन्न प्रशिक्षणक्रम' हेटकरी भंडारी सभागृह, दादर येथे हलवण्यात आला होता.
या संपूर्ण काळात, मला ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब वगळता, कोणताही त्रास नव्हता.
'भारतीय आयुर्विमा महामंडळा'तील 'विकास अधिकारी', ही नोकरी व सामाजिक दृष्टिकोनातून चालवलेले 'प्रसन्न प्रशिक्षणक्रम' या दोन्ही बोटींमधून प्रवास करताना थोडी दमछाक होऊ लागली. १९९८ मध्ये मी 'प्रसन्न' मध्ये पूर्ण झोकून देण्यासाठी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. 'भारतीय आयुर्विमा महामंडळा'तील अनेक मित्र मला त्यापासून परावृत्त करत होते. माझा अतिशय चांगला मित्र, श्री. विनायक कामथ, याच्या मते मी घाईगडबडीत तो निर्णय घेत होतो. त्याच्या मते, मी दोन्ही गोष्टी सांभाळू शकतो. परंतु त्या सगळ्यांना विनम्र नकार देत, मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. मी नोकरी करत असताना माझ्या ब्रॅंच मध्ये, शक्यतो माझा पहिला क्रमांक सोडला नव्हता.
मध्यंतरीच्या काळात कल्याण येथून परत नेहरुनगर कुर्ला येथे शिफ्ट झालो. त्यानंतर जवळजवळ चार वेळा विविध घरात स्थानांतरित केले. या प्रत्येक वेळेस माझा मित्र श्री. विक्टर फर्नांडिस हा मला मदत करायला हजर होता. आजही मी विक्टरला आताच्या भाषेतला 2am मित्र मानतो व तो आहे. त्याच्या बरोबरीने, सुरुवातीच्या काही वर्षांपासून श्री. गणेश काळे (ज्याच्यासोबत मी सर्वात जास्त थट्टामस्करी करतो), श्री. राकेश फर्नांडिस, श्री. मारुती साळुंखे, श्री. अनिल म्हात्रे, श्री. राजन मांजरेकर, श्री. जेम्स फर्नांडिस, श्री. योगेश दळवी, श्री. संदीप व सौ. दिप्ती वगळ, श्री. संतोष चव्हाण, श्री. भगवान पाटील, श्री. विद्याधर राणे, सौ. रेखा व श्री. जगदीश राऊत, श्री. अमर पाटील, श्री. अनुपम सोनावणे, श्री. नागेश राऊत, श्री. शिवप्रसाद भिडे असे अनेक प्रसन्न मित्रमैत्रिणी मला लाभत गेले. त्यात प्रत्येक वर्षी नवनवीन प्रसन्न मित्र-मैत्रिणींची नावे वाढत गेली. नंतर वेळोवेळी या मित्रमैत्रिणींबद्दल लिहिता होईन. याबाबतीत मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजतो.
नोकरी सोडल्यानंतर घडलेली एक मजेशीर गोष्ट म्हणजे, मी नोकरी सोडल्यानंतर काही दिवसांनी एक यशस्वी ट्रेनर मला दादर येथे भेटले. थोड्याशा गप्पा झाल्यानंतर मी त्यांना नोकरीच्या राजीनाम्याची बातमी दिली. ऐकून ते स्तब्ध झाले. आणि नंतर मला समजावू लागले, "बिपिन, हे आपण इतरांना सांगायचे असते, आपण करायचे नसते." हे ऐकून मला धक्का बसला. मी हसून त्यांचा नमस्कार घेतला.
१९९९ मध्ये माझ्या प्रथम पुस्तकाचे, 'चला होऊ या प्रसन्न' या पुस्तकाचे प्रकाशन लोकप्रिय क्रीडा समीक्षक श्री द्वारकानाथ संझगिरी, यांच्या हस्ते झाले. प्रकाशन सोहळ्याचे संपूर्ण नियोजन प्रसन्न परिवाराने केले होते. 'प्रसन्न परिवार' म्हणजे जे प्रसन्न प्रशिक्षणक्रम पूर्ण करतात, त्यांचा प्रसन्न परिवारामध्ये समावेश होत असतो आणि आमचे ऋणानुबंध कायमचे जोडले जातात. श्री. द्वारकानाथ संझगिरी यांना, खास करुन प्रस्तावनेनेमधील एक वाक्य अत्यंत भावले होते; जे मी माझ्या पत्नीसाठी लिहिले होते. ते वाक्य होते,
"पणतीमधील तळपणारी ज्योत सर्वांना दिसते, परंतु पणतीमध्ये जळणारे तेल मात्र लोकांना दिसत नाही."
माझ्या या संपूर्ण प्रयोगांत-प्रवासात तिची आश्वासक साथ होती व आहे.
पुढे चालू....
Comments
Post a Comment