पार्श्वभूमी
किडनी हा मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. आजपर्यंत किडनी कडे आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होत गेले आहे.
माझे नकळत का होईना, दुर्लक्ष झाले होते. तसेच सर्वसाधारण आजारांवर, माझा इलाज करणारे, जनरल फिजीशिअन यांचे सुद्धा दुर्लक्ष झाले होते.
माझे ४५ वर्षांपर्यंत, हॉस्पिटलचे तोंड न बघितलेले आयुष्य, ते आता २०२१ मध्ये झालेले किडनी ट्रान्सप्लांट, तसेच त्यापूर्वीच माझ्या शरीरात नकळत बिघडत गेलेले किडनीचे कार्य; काही डॉक्टरांचे दुर्लक्ष तर काही डॉक्टरांचे अथक कार्य, इतर मेडिकल स्टाफचे अनुभव, मी या ब्लॉगमध्ये लिहिणार आहे.
नकारात्मक अनुभवांमध्ये, कुणाचेही नाव लिहिणार नाही. पण, कृतज्ञता म्हणून, ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी मदत केली, त्या प्रत्येकाचे नाव नमूद करण्याचा प्रयत्न करणार आहे.
मधील काळात, जवळच्या व्यक्तींच्या विचित्र वागण्यामुळे कडवटपणा आला होता. पण परमेश्वराच्या कृपेने वेळीच त्यातून सावरलो गेलो.
या अनुभवांतून, मी काय शिकलो व कशा प्रकारे शिकलो; यावर या ब्लॉगमध्ये भर देणार आहे. माझे आध्यात्मिक जीवन व माझा २३ वर्षांतील २९ विषयांमधील, प्रशिक्षणाचा अनुभव मला कसा उपयोगी पडला व पडत आहे, यावर सुद्धा भर देणार आहे.
माझ्या वैयक्तिक अनुभवांतून, माझ्या चुकांमधून, मला मिळालेल्या अंतर्दृष्टीतून; तुम्हाला योग्य संदेश मिळत राहतील, अशी अपेक्षा आहे. जे तुम्हाला आयुष्यात उपयोगी ठरतील.
आठवड्याला, दर सोमवारी वा मंगळवारी, मी एकेक ब्लॉग (अनुभव) लिहिणार आहे. नंतर आठवडाभर, त्यावर चर्चा करण्याचा विचार आहे.
तेव्हा, दर आठवड्यात या ब्लॉगवर भेटत राहू या....

Comments
Post a Comment