९. संवाद तुमच्या माझ्यामधील: श्रद्धा व सबूरी

 संवाद तुमच्या माझ्यामधील

    श्रद्धा व सबूरी


या वेळी थोडा जास्त ब्रेक घेतला. अनेक मित्रमैत्रिणींच्या वैयक्तिक प्रतिक्रिया आल्या होत्या व येत आहेत.


सर्वात प्रथम, अनेक जणांच्या मते, 'मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट' या पुस्तकाशी जोडले जात असतानाच, मध्येच 'हेवा', 'मत्सर' व 'द्वेष' ही तीन लेखांची मालिका आली. बहुतेक जणांनी पुस्तकाचाच भाग समजून वाचायला सुरुवात केली व गोंधळ उडाला.


व्यावसायिक रित्या ऑनलाईन समुपदेशन (counseling) वा Personal Mentoring करत असताना, अनेक वेळा काही विचारांशी जोडला जातो. आणि त्या वेळी जाणवते की, या विचारांचा फायदा जास्तीत जास्त जणांना झाला पाहिजे. मग ते विचार शक्य तितक्या विस्तृतपणे (जास्त विस्तार टाळून) लिहून काढतो व सरळ सोशल मीडियावर प्रसिद्ध करतो. 


खरं तर, व्यक्तीगत समुपदेशन (counseling) व  मग , मार्गदर्शन (Mentoring) मध्ये त्या त्या व्यक्तीशी निगडित तपशील माहीत असतो.  इथे मर्यादा ही असते की प्रत्येक जण त्या विचारांचा काय अर्थ काढतो, ते समजत नाही.


काही जवळच्या मित्रमैत्रिणींमुळे झालेला गोंधळ लक्षात आला. आताही काही विषयांवर लेखन सुरु आहे. उदाहरणार्थ, संताप, राग व क्रोध.. पण आता शक्यतो, ही तीन लेखांची मालिका व इतर लेखमाला प्रसिद्ध करणार नाही. माझे काही ग्रुप्स आहेत, तिथे मात्र त्या त्या ग्रुप्सशी निगडित छोटे छोटे विचार मांडत राहणार.


काही जण, आजही विचारत आहेत की, दुसरा पर्याय कशासाठी नाही शोधला?


त्या वेळी creatinine या बद्दल काहीही माहिती नव्हती. किंवा आजसारखं गुगलबाबांना विचारणे, ठाऊक नव्हते. हे माझे अज्ञान होते. २००४ मध्ये मला creatinineचे महत्व कळत नव्हते, पण डॉक्टरांना तरी कल्पना असायला हवी होती.


 परत एकदा नमूद करु इच्छितो की, २०११ पर्यंत मला तब्येतीचा कोणताही त्रास जाणवत नव्हता. २०१२ मध्ये जेव्हा जास्त जाणवला, तेव्हा डॉक्टरांनी हात वर केले.


अजून एक महत्वाचा मुद्दा माझ्या निदर्शनास आणून देण्यात आला. तो म्हणजे १९९६ ते २०१२ व २०१२ ते २०१८ या दरम्यानची व्यावसायिक प्रवासाची माहिती मी दिली आहे. पण जेव्हा २०१२ मध्ये वस्तुस्थिती ची जाणीव झाली, त्यानंतरच्या वैद्यकीय प्रवासाची माहिती दिलेली नाही. मी लिहिता लिहिता मध्ये छोटे छोटे उल्लेख करणार होतो.


मी खरं तर प्रामाणिकपणे या विस्तृत लिहिण्याबद्दल विचार केला नव्हता. मी २०११ ते २०१८ पर्यंतच्या वैद्यकीय प्रवासाबद्दल थोडे विस्तृत लिहायला सुरुवात केली आहे.


कागदरुपी पुस्तक प्रसिद्ध करण्याचे आपले फायदे आहेत. तिथे प्रतिसाद मिळतो पण त़ो पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर! इथे मध्ये मध्ये प्रतिसाद मिळाल्याने, चुका दुरुस्त करता येतात. दाद मिळाल्यामुळे, लेखनाचा हुरुप वाढतो.


आपल्या सर्वांना या मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद! असेच आपले प्रेम लाभत राहो.


आपलाच,

बिपिन मयेकर


टिप: 


खूप सारे मित्रमैत्रिणी, हॉस्पिटल मधील फोटो बघून, चिंतित झाले आहेत. तर, काही जणांचा समज आहे की, मी ठणठणीत आहे. अशा सर्वांच्या माहितीसाठी:


परमेश्वराच्या कृपेने तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. 


दोन महिने Online Consultation घेतल्यानंतर, ४ जून २०२१ रोजी, प्रभावी नेफ्रॉलॉजीस्ट श्री. भरत शहा, यांनी हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलावले. मला व माझे रिपोर्ट्स तपासले आणि पाठीवर हात थोपटून सांगितले की, तू खूप साऱ्या complications मधून बाहेर आला आहेस. मी लगेच परमेश्वराचे आभार मानले. कारण किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी नंतर लगेच काही दिवसांनी, मला परत ॲडमिट करावे लागले होते.


डिस्चार्जच्या वेळी, सांगण्यात आले, आता परमेश्वरची प्रार्थना करा. तो चमत्कार करतो. मी व माझी पत्नी सुप्रिया व मुलगी निहारिका; आम्ही तिघेही काही क्षण घाबरलो. एके काळी ८३ किलो वजन असणारा मी, ५३ किलो वजनापर्यंत खाली घसरलो होतो. 


माझा व कुटुंबियांचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास आहे. माझी पत्नी सुप्रिया व मुलगी निहारिका, यांची जपणूक व परमेश्वराचा आशीर्वाद, यामुळे मी त्यातून बाहेर पडलो आहे. काही महिन्यांत परमेश्वर कृपेने व तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांनी, मी पूर्णपणे बरा होऊन, सज्ज असेन; ही अपेक्षा आहे.


पुढच्या लेखांमध्ये, या अनुभवांबद्दल विस्तृत लिहिणार आहेच.


आपलाच,

बिपिन मयेकर

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.

: श्री स्वामी समर्थ

Comments

Popular posts from this blog

विशेष विनंती:

प्रस्तावना

३. फ्लॅशबॅक