४. अतिविश्वास, गैरसमज व मोजलेली किंमत
मी, किडनी डायलिसिस व ट्रान्सप्लांट
मला सल्फाची ॲलर्जी आहे, हे समजून येण्यासाठी, मला फार मोठी किंमत मोजावी लागली होती.
पण नंतर १९९७ पासून माझे ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब, हळूहळू वाढू लागला. डॉक्टरांच्या मते माझा व्यवसायाचा व्याप वाढत होता, त्यामुळे त्याचा परिणाम ब्लडप्रेशर वर होत होता.
'डॉक्टर म्हणजे देव!'
ते सांगतील ते ऐकायचे, या नियमाने मी दर महिन्याला जाऊन त्यांना भेटत होतो. त्यांनी सांगितलेली औषधे घेत होतो. त्यांनी सांगितलेल्या टेस्ट करत होतो.
२००४ नंतर मध्ये मध्ये जेव्हा पायावर सूज येत होती. तेव्हाही डॉक्टर म्हणायचे, हे ब्लड प्रेशर मुळे होत आहे. असे करता करता पंधरा वर्षे गेली. २०१२ मध्ये मी बिझनेस टूरवर होतो. त्यावेळेस मला दिवसभर काही खाता आले नव्हते.
परत आल्यानंतर मला लगेच दुसऱ्या टूरला जावे लागले. तिथे मी तीन दिवस होतो. तिथेही बरं वाटत नव्हतेच. पण तेव्हा इच्छाशक्तीच्या जोरावर ते तीनही दिवस मी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतले. पण परत येताना मला खूप त्रास होऊ लागला. जेव्हा मी घरी पोचलो, त्यावेळेस मी गलितगात्र झालो होतो.
दुसऱ्या दिवशी माझी पत्नी सुप्रिया जेव्हा मला त्याच डॉक्टरांकडे घेऊन गेली, तेव्हा त्यांनी मला काही टेस्ट करायला सांगितल्या. त्या टेस्ट करुन, दोन दिवसानंतर, जेव्हा आम्ही त्यांना परत भेटायला गेलो; तेव्हा नेहमी हसतमुख असणारे डॉक्टर गंभीर झाले. त्यांच्या केबिनमध्ये, त्यांच्यासमोर आम्ही दोघे बसलो होतो. त्यांचा गंभीर चेहरा बघून आम्हाला काही कळत नव्हते. फक्त एवढे लक्षात आले होते की रिपोर्ट मध्ये काहीतरी गडबड आहे. एक दीर्घ श्वास घेऊन डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, "बिपिनच्या दोन्ही किडनी निकामी झालेल्या आहेत. आता मी काहीही करु शकत नाही. त्यापुढे काय झाले ते आपण भाग एक मध्ये अगोदर वाचले आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट:
२०१८ मध्ये जेव्हा माझे डायलिसिस सुरु झाले, तेव्हा मुंबईतील अत्यंत अनुभवी व निवृत्त झालेले एक नेफ्रोलॉजिस्ट यांना आम्ही जेव्हा, माझ्या आत्येभावाच्या ओळखीने भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला तपासले व जवळजवळ दीड तास ते माझे १९९७ पासूनचे मेडिकल रिपोर्टस तपासत होते.
नंतर त्यांनी मला विचारले, "तुझ्या दोन्ही किडनी कशामुळे निकामी झाल्या आहेत?"
मी त्यांना उत्तर दिले, "माझ्या सगळ्या मेडिकल रिपोर्टवर हायपरटेंशन असे लिहिले आहे. म्हणजेच, ब्लड प्रेशर मुळे माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत."
तेव्हा त्या वयस्कर व अनुभवी नेफ्रोलॉजिस्ट, यांनी आम्हाला धक्का दिला व आम्हाला दाखवून दिले की १९९७ मध्ये झालेल्या त्या इन्फेक्शन नंतर, आतून माझ्या किडनीवर परिणाम होत होता. परिणामी, माझे ब्लड प्रेशर वाढत होते. पण पंधरा वर्षे किडनीच्या अवस्थेला तपासून, त्यावर औषध घेण्याऐवजी मी त्या डॉक्टरांना देव मानून ब्लड प्रेशरची औषधे घेत होतो.
१९९७ मध्ये वा नंतर, तात्कालीन जनरल प्रॅक्टिशनर असलेल्या डॉक्टरांनी, किडनीच्या टेस्ट केल्या असत्या वा २००४ मध्ये क्रिएटानाईन १.६ झाल्यावर, त्वरित नेफ्रोलॉजिस्टकडे पाठवले असते; तर आज परिस्थिती वेगळी असती. पण १५ वर्षे सदर डॉक्टर ब्लडप्रेशर वर उपचार करत राहिले. माझे मित्र-मैत्रिणी व नातेवाईक त्या जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांवर प्रचंड रागावले होते. मला सुद्धा सुरुवातीला राग आला होता. पण घडलेल्या चुकीमध्ये, डॉक्टरांचा वाईट हेतू नव्हता. पण, त्यांचा कदाचित अति-आत्मविश्वास नडला.
पंधरा वर्षे त्यांच्याबरोबर मी काही चांगले क्षण घालवले होते. पण त्यांचं हे दुर्लक्ष झाल्यामुळे मला डायलिसिस व नंतर किडनी ट्रान्सप्लांट पर्यंत जावे लागले.
मी सर्व वाचकांना विनंती करेन की त्यांनी डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवावा. पण जर होणारा त्रास वाढत असेल तर मात्र, दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. पंधरा वर्षे, मी ही चूक केली की मी पूर्णपणे एकाच डॉक्टरवर अवलंबून राहिलो. उगाचच्या उगाच, दहा डॉक्टरांकडे फिरणे, शहाणपणाचे नाही. पण, त्रास कमी होत नसेल, वा वाढत असेल, तर मात्र दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अनेक डॉक्टरांना हे आवडत नाही. पण, आपल्या आयुष्याचा प्रश्न असेल तर तो आपला अधिकार आहे.
आपलाच,
बिपिन मयेकर
काळजी करण्यापेक्षा अगोदर काळजी घ्या.
Comments
Post a Comment