२. दुसरी इनिंग
मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट:
वळण: क्षणात बदललेलं आयुष्य
पुढे चालू..
त्याक्षणी आम्ही नवराबायको हतबल झालो होतो. पण घरी आल्यावर देव्हाऱ्यात दिवा लावला. आणि परमेश्वराची हात जोडून प्रार्थना केली. मग ठरवले की आपण किडनी तज्ञांना भेटून नेमके निदान करु या. म्हणून आम्ही माहीम येथील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हते कि किडनी विकारांसाठी असणाऱ्या डॉक्टरांना 'नेफ्रोलॉजिस्ट' संबोधतात.
जाताना सुद्धा, आता काय ऐकायला मिळेल, याची धास्ती होती. पण तेथील नेफ्रोलॉजीस्ट यांनी अगोदर आम्हाला धीर दिला.
त्यांनी समजावून सांगितले की "अजून तुमच्या दोन्ही किडनी पूर्ण निकामी नाही झाल्या आहेत, पण त्या निकामी होण्याच्या मार्गावर आहेत. तुम्ही अगोदरच यायला हवे होते."
"२००४ मध्ये तुमची क्रिएटाइन लेवल वाढली होती. तेव्हाच तुमच्या डॉक्टरांनी, जे जनरल प्रॅक्टिशनर आहेत, त्यांनी तुम्हाला आमच्याकडे अर्थात नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंटकडे पाठवायला हवे होते. तेव्हा तुम्ही क्रोनिक किडनी डिसीजचे रुग्ण नव्हता. तेव्हा तुमच्या किडनी वाचवता आल्या असत्या. पण आता मात्र तुम्ही क्रोनिक किडनी डिसीजचे रुग्ण झाला आहात."
"जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत आपण औषधांनी तग धरु या. जेव्हा एकदमच आवश्यक असेल, तेव्हा तुमचे डायलिसिस सुरु करु या."
आम्ही तेवढ्याच समाधानात घरी परतलो. परत येताना, माझं मन भूतकाळात १९९७ सालात गेले होते, जेव्हा या सगळ्यांची नकळत सुरुवात झाली होती.
उद्या पुढील भाग..
Comments
Post a Comment