८. पेशंट सुद्धा ग्राहक आहे..

 मी किडनी डायलिसिस व ट्रान्सप्लांट


ग्राहक आहे म्हणून व्यवसाय आहे..

पेशंट सुद्धा ग्राहक आहे..


पुढे चालू....


मला जो बेड मिळाला होता, ती अत्यंत छोटी जागा होती. मेडिकल उपकरणे बऱ्यापैकी होती. रात्री उशिरा, हेड नर्स एका अत्यंत तरुण नर्सला घेऊन आल्या. माझ्या हातामध्ये, योग्य नस ओळखून तिथे Intravenous (IV) cathetar लावायचा होता.


अनेस्थेसिया, पेनकिलर्स, ॲंटिबायोटिक्स आणि इतर महत्त्वपूर्ण द्रवपदार्थांचे संचालन करण्यासाठी, डॉक्टर आणि नर्स IV थेरपीचा वापर करतात.  


शस्त्रक्रियेदरम्यान, आयव्ही तयार करुन ठेवलेले असल्यास, आवश्यकतेनुसार आपत्कालीन योग्य औषधे, त्वरित आणि कार्यक्षमतेने दिली जाऊ शकतात.


मी हेड नर्सना विचारले, हिला अनुभव आहे काय? त्या हेड नर्स यांनी, माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन, त्या तरुण अननुभवी नर्सला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. तेव्हा मी व माझ्या पत्नीला लक्षात आले की, माझा गिनीपिग अर्थात बळीचा बकरा म्हणून वापर केला जाणार होता.


नंतर त्या अननुभवी नर्सने सुई हातात टोचली आणि माझ्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी बाहेर आली. अनुभवी व महत्वाचे म्हणजे, कौशल्य आणि संवेदनशील नर्स अत्यंत प्रभावीपणे आयव्ही इंजेक्ट करतात. पण या तरुण नर्सला अजिबात अनुभव नव्हता. 


तिने इंजेक्शन हातात टोचल्यानंतर, हाताच्या आतमध्ये सुई फिरवून नस शोधायला सुरुवात केली. बहुतेक ती सुद्धा पहिला अनुभव असल्यामुळे घाबरलेली होती. पण ती सुई आतमध्ये विचित्र पद्धतीने फिरवत होती. त्यामुळे मला प्रचंड त्रास होत होता. मी अक्षरशः तळमळत होतो. त्या हेड नर्सने माझा हात व डोके अत्यंत जबरदस्तीने पकडून ठेवले होते. माझी तळमळ बघून माझी पत्नी, सुप्रिया जी स्वतः अत्यंत खंबीर आहे, तिला चक्कर आली. पण याचा कोणताही परिणाम त्या दोन्ही नर्सवर झाला नाही. शेवटी हेड नर्सने कंटाळा येऊन स्वतःच एकदाचा आयव्ही इंजेक्ट केला.


दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील एक नर्स आम्हाला भेटायला आली. तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता बघूनच आम्हाला बरे वाटले. तिने आम्हाला समजावून सांगितले की, कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण तुम्ही जो बेड घेतला आहे, तो बेड निर्धन व निर्बल अशा दोन्ही घटकांचा मिळून आहे. तुमच्या कपड्यांवरुन तुम्ही चांगल्या घरातील दिसता. तरी तुम्ही हा बेड घेतला, त्यामुळे नर्स व सर्व स्टाफ थोड्या वेगळ्या नजरेने तुमच्याकडे बघत आहेत. शक्य असल्यास व तुम्हाला योग्य वाटले तर तुम्ही जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होऊ शकता. 


आम्ही तिचे आभार मानले व तिला सांगितले, काल रात्री ॲडमिट होऊन उपचार सुरु होते, आवश्यक होते. म्हणून आम्ही चौकशी न करता हा बेड स्विकारला. आम्ही त्वरित दुसरा पर्याय शोधतो.


पण त्यानंतर आमची ट्यूब पेटली आणि आल्यापासून मला मिळत असलेल्या, वेगळ्या स्वरुपाच्या वागण्याबोलण्याबद्दल, गैरसमज दूर झाला. आम्ही नंतर दुसऱ्या वॉर्डमध्ये बेड शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. तिथे आम्हाला मकरंद नावाचे अधिकारी भेटले. ते मिलिंदचे मित्र निघाले. त्यांनी सांगितले की एक डीलक्स रुम आहे, पण त्याचे भाडे जास्त आहे. माझी पत्नीने ते मान्य केले व त्याचे रितसर आगाऊ पेमेंट केले. डायलिसिस झाल्यानंतर मला डायरेक्ट तेथे शिफ्ट करण्यात आले.


तत्पूर्वी मला सकाळी पावणे बारा वाजता त्याच निर्धन व निर्बल बेडवरून, मानेमध्ये कॅथेटर बसवण्यासाठी नेण्यात आले. मला जेवण सुद्धा मिळाले नव्हते, तसेच मला प्रचंड थंडी वाजत होती. मला व्हीलचेअरवर बसवून, ऍम्ब्युलन्समधून मुख्य इमारतीत नेण्यात आले. तिथे पहिल्या मजल्यावर आणि मानेमध्ये कॅथेटर बसवण्याची प्रोसिजर होणार होती. मला बाहेर लॉबीमध्ये व्हीलचेअरवरच बसवण्यात आले होते. 


मला त्यानंतर कुणीही हॉस्पिटलमधून जेवण्यासाठी विचारले नाही किंवा थंडीसाठी काही केले नाही. शेवटी माझी मुलगी, निहारिका हिने दोन ब्लॅंकेट्स आणली व ती माझ्या अंगावर घातली. नंतर लक्षात आले की लॉबी मधील एसीचे कूलिंग सुद्धा जास्त आहे. म्हणून मग मला पहिल्या मजल्यावरच, अशा ठिकाणी नेण्यात आले, जिथे कूलिंग जास्त नव्हते. मध्येच मला सांगण्यात आले एक लहान मुलाची केस आहे, त्याला आम्ही मध्ये आत घेत आहोत. मी "ठिक आहे." म्हटले. पण लॉबीमध्ये व्हीलचेअरवर बसून कंटाळा आला होता. 


पाच वाजता संध्याकाळी एक उंच व जाडसर माणूस, तिथे आला. प्रोसीजर रुमच्या बाहेर तो पाच मिनिट उभा राहिला. इतक्यात आतून तीन-चार जण बाहेर आले. त्यांच्या अंगावर व्हाइट ॲप्रन होते. त्यांच्यातील एक साधारण सहा फूट उंचीचा गोरा पान व मिशी असलेला आणि साधारण पस्तीस वयाचा माणूस, जो बहुदा डॉक्टर असावा; त्या पाच मिनिटे अगोदर आलेल्या माणसाला भेटला. दोघांचे बोलणे झाले. मग त्या बहुदा डॉक्टर असलेल्या व्यक्तीने, प्रोसिजर रुमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये ओरडून सांगितले, "अरे माझा मित्र पाच तास बाहेर उभा आहे. त्याला अगोदर आत घ्या. आणि नवल म्हणजे त्याला लगेचच प्रोसीजर रुममध्ये घेण्यात आले. 


मी मात्र पाच तास बाहेर व्हीलचेअरवर बसून सुरू, कुणाच्याही खिजगणतीतही नव्हतो. पाच नंतर शेवटी एकदाचे मला आत घेण्यात आले. आत असलेला ब्रदर अतिशय चांगला होता. मला लघवी करायची होती तर त्याने मला लगेच हाताला धरून बाथरूम मध्ये नेले. तेथील डॉक्टर हे खूपच चांगले डॉक्टर होते. त्यांनी मला बोलण्यात गुंतवले. तसेच माझ्या पायाखाली बेडवरच गरम हवा सोडणारे मशीन ठेवले.  त्यामुळे मला थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी मानेमध्ये, उजव्या बाजूला कट करुन, नस खेचून त्यात कॅथेटर बसवला. पण त्यांचं काम इतके कुशलता पूर्वक होते की, मला अजिबात जाणीव झाली नाही. 


नंतर मला परत वॉर्ड मध्ये नेण्यात आले, त्याच जुन्या निर्धन व निर्मल बेडवर.. आम्ही मागणी केल्यावर थोडासा स्नॅक व चहा देण्यात आला. थोड्या वेळानंतर लगेच मला तळमजल्यावर डायलिसिस साठी नेण्यात आले. माझे पहिलेच डायलिसिस सेशन होते, त्यामुळे मनात थोडी भीती होती. पण मी बेडसाठी वेट करत असतानाच, एक अत्यंत फिट असे मध्यमवयीन गृहस्थ  समोरुन आले. त्यांच्या हातावर बांधलेल्या बेल्टमुळे कळत होते की आताच त्यांचे डायलिसिस झालेले आहे. त्यांनी माझ्याशी छान गप्पा मारायला सुरुवात केली आणि मला सांगितले, मी पंधरा वर्षे डायलिसिस करत आहे. तरीही अत्यंत फिट आहे. कारण मी माझ्या शरीराची तशी काळजी घेतो. तेव्हा तुम्हीपण निर्धास्त रहा आणि डायलिसिस बरोबर शरीराची काळजी घ्या. माझ्या मनाचा भार हलका झाला. 


मग मी बिनधास्तपणे बेडवर जाऊन झोपलो. बॅड चांगलाच मोठा होता. पाठीमागे भिंत व समोर तिन्ही बाजूने (कर्टन) हिरवे मोठे पडदे होते. माझ्या डायलिसिस सेशनची तयारी सुरु असतानाच दोन डायलिसिस टेक्निशियन व एक सपोर्ट स्टाफ मला भेटायला आले. त्यांनी माझ्याशी हसतखेळत गप्पा मारत, माझ्या मनातला उरलासुरला ताण दूर केला. 


थोड्यावेळाने माझे डायलिसिस सुरु झाले. डायलिसिसच्या सुरुवातीला इंजेक्ट करताना मला थोडासाच त्रास झाला. कारण तो टेक्निशियन अनुभवी होता. पण डायलिसिस चालू असताना मला लघवी (यूरिन) पास करायची होती. थोडावेळ मी नियंत्रण केले. पण नंतर राहवले नाही, तेव्हा तेथील सपोर्ट स्टाफला सांगितले. त्यांनी एका व्यक्तीला हाक मारुन मला युरीन पॉट द्यायला सांगितले. ती व्यक्ती युरीन पॉट घेऊन आली व मला मदत करायला लागली. मला याची सवय नव्हती, म्हणून मी त्यांना विनंती केली की मी सांभाळून घेईन. तुम्ही पडद्याबाहेर थांबा, झाले की मी तुम्हाला हाक मारेन. बहुदा त्यांना पहिल्यांदाच डायलिसिस करणारा पेशंट किती बावरलेला असतो याची कल्पना होती. 


शक्यतो डायलिसिस करणाऱ्या पेशंटला युरीन होत नाही पण परमेश्वर कृपेने मला चांगल्या प्रमाणात युरीन होत होती. मी युरीन पास केले. पण करत असताना माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती. लघवी केल्यावर मी त्या व्यक्तीला हाक मारली आणि ते युरीन पॉट घेऊन गेले. 


अधून मधून माझी पत्नी सुप्रिया, मुलगी निहारिका, भावासम पुतण्या मिलिंद, मोठा भाऊ सतिशदादा तसेच आलेले मित्र येऊन बघून जात होते. डायलिसिस संपल्यानंतर मला वर डीलक्स रुममध्ये नेण्यात आले.


डीलक्स रूम अतिशय प्रशस्त होती. समोरच्या दोन V shape भिंतींमध्ये वरुन खाली अर्ध्या भागात खिडक्या होत्या व त्यात काचा लावलेल्या होत्या. त्यातून समोरचा समुद्र व बीच तसेच बांद्रा सी लिंक रोड व्यवस्थित दिसत होते. त्या रूम मध्ये आल्यावर प्रसन्न वाटले. नंतर मग नर्स कडून औषधे सुरू झाली. पूर्वीचा बेड असताना व आता डिलक्स तुमच्या वागणुकीमध्ये प्रचंड फरक होता. येथील सर्व नर्स अत्यंत प्रोफेशनल होत्या. मी जो पर्यंत तिकडे ॲडमिट होतो, त्यांनी माझी अत्यंत चांगल्या प्रकारे देखभाल केली. मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तेथील स्टाफने सुद्धा माझ्या बरोबर जे राहत होते, माझी पत्नी किंवा मुलगी यांना खूप चांगले सहकार्य केले. त्यांचे सुद्धा आभार!


नंतर एका डायलिसिसच्या दरम्यान काय झाले कळले नाही. पण डायलिसिस सुरू झाल्यानंतर, मला लक्षात आले की माझा पाठीमागे ओलसर लागत आहे. माझा संपूर्ण शर्ट पाठीमागून भिजलेला होता. मी हाक मारल्यानंतर, तिथे उपस्थित एक डायलिसिस टेक्निशियन बघायला आली. तिने बेडकडे बघताच तिचे डोळे विस्फारले गेले. व तिने पटकन ज्यांनी डायलिसिस सुरु केले होते, त्या टेक्निशियनला हाक मारली. त्याने येऊन ते बघितले. मग त्यांचे सीनियर आले आणि त्यांनी डायलिसिस थांबवायला सांगितले. 


कारण डायलिसिस करताना एका ट्यूबने शरिरामधून अशुद्ध रक्त एका ट्यूबने वारे काढले जाते, ते मशीनमध्ये फिरवले जाते, डायलायझर मध्ये स्वच्छ केले होते आणि परत दुसऱ्या ट्यूबमधून मधून शरीरात सोडले जाते.


या कनेक्ट करणाऱ्या ट्यूब्स, नीट कनेक्ट झालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे, त्यांच्यातून सगळे रक्त बाहेर येत होते व त्यात माझा संपूर्ण शर्ट पाठीमागून रक्ताने भिजला होता. डायलिसिस सेशन थांबवताना, तिथे व्हिजिटला आलेल्या शिकवू नर्स भोवती गोळा झाल्या आणि माझे डायलिसिस थांबवणारे टेक्निशियन, प्रोसेस अर्धवट सोडून, त्या ट्रेनी टेक्निशियनना समजावू लागले. मग मात्र मी भडकलो. तेव्हा नेफरोलॉजीमधील डिपार्टमेंट एक ज्युनिअर डॉक्टर मला भेटायला आला. त्याने संपूर्ण प्रोसेसवर संपेपर्यंत स्वतः देखरेख ठेवली. 


त्यानंतर, जेव्हा मला व्हीलचेअर वरून बाहेर नेण्यात येत होते, तेव्हा तो ज्युनियर डॉक्टर आला आणि मला विचारु लागला, "एवढ्या छोट्याशा गोष्टीचा तुम्ही कशाला केला इशू केलात?" 


माझ्यासाठी हा धक्का होता. नंतर कळले, तो तर फक्त ट्रेलर होता. पुढे अनेक चांगले व काही चांगले नसलेले अनुभव आले.  


तेथील मुख्य नेफ्रॉलॉजीस्ट माझ्यासाठी देवदूत होते, आहेत व राहतील, जरी नंतर तेथील अनुभवांना कंटाळून, आम्ही ते हॉस्पिटल सोडले तरीही....


याच हॉस्पिटलमधील अनेक चांगल्या व चांगल्या नसलेल्या अनुभवांची शिदोरी पुढच्या भागांमध्ये सोडायची आहे.


क्रमशः


आपलाच,

बिपिन मयेकर

Comments

Popular posts from this blog

विशेष विनंती:

प्रस्तावना

३. फ्लॅशबॅक