दोन शब्द समर्पणाचे
दोन शब्द समर्पणाचे:
माझा भाऊ श्री सतीश मयेकर, याचा मी अत्यंत ऋणी आहे. त्याचे उपकार मी कोणत्याही प्रकारे फेडू शकत नाही. त्याने त्याची किडनी देऊन, मला पुनर्जन्म दिला आहे. किडनी देण्यापूर्वी व दिल्यानंतर सुद्धा तो अत्यंत शांत आहे कोणत्याही प्रकारचा बडेजाव मिरवत नाही. असा भाऊ परमेश्वराच्या कृपेने लाभतो.
माझ्या आजारपणात, मला आईच्या ममतेने जपणारी माझी पत्नी, सौ. सुप्रिया व वडिलांप्रमाणे मला शिस्त लावणारी, माझी मुलगी कुमारी निहरिका या तिघांना मी हे पुस्तक समर्पित करत आहे.
२०१२ मध्ये जेव्हा समजले की मला किडनीचा त्रास आहे, तेव्हापासून माझा दोन नंबर मोठा भाऊ सतीशदादा हा सारखा मला धीर देत असे व त्याचे म्हणणे होते, ,"तू बिनधास्त रहा. तुला गरज लागेल, तेव्हा माझी किडनी मी तुला देईन." तेव्हा आम्ही कोणत्याही टेस्ट सुद्धा केल्या नव्हत्या पण तरीसुद्धा त्याला खात्री होती की आमच्या किडनी मॅच होणार म्हणून, आणि पुढे तेच झाले.
२०१८ पासून मी बेड रेस्ट वर आहे आणि त्या दिवसापासून माझ्या आजारपणात माझ्या पत्नीने आर्थिक, मानसिक, भावनिक अशा सर्व स्तरांवर माझ्या कुटुंबाला सांभाळले आहे. माझ्यासाठी तिने दिवसांतील, २४ तास स्वतःला वाहून घेतले आहे. दिवसातील माझं योग्य वेळी खाणेपिणे, अर्थात ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण आणि या प्रत्येक खाण्यानंतर माझी औषधे यावर तिचा पूर्णपणे कटाक्ष असतो.
तसेच या काळात झालेली छोटी-मोठी ऑपरेशन्स, प्रोसिजर्स, वेगवेगळ्या टेस्ट (एमआरआय, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, यूरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, बायोप्सी व डायलिसिस) यादरम्यान झालेले हॉस्पिटलमधील काही गोंधळ आणि काही वेळेला अचानक उद्भवलेली कठीण परिस्थिती; अशा सर्व प्रसंगात ती ठामपणे माझ्या सोबत उभी राहिली. रात्री मला खोकला जरी आला तरी ती उठून बसते. २०१८ पासून माझ्या तब्येतीचा आलेख (graph) सतत वर खाली होत राहिला होता. पण ती मात्र प्रत्येक वेळी खंबीर होती. या काळात खरोखरच तिने माझी आईच्या ममतेने माझी काळजी घेतली. माझी आई जशी अडचणींचा बाऊ न करता, कठीण परिस्थितीचा सामना करत असे, त्याचप्रमाणे माझी पत्नी सुप्रिया सामना करत राहिली व राहते आहे.
डायलिसिस सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने माझी पत्नी सौ सुप्रिया माझी मुलगी मिळाले का निहारिका माझा मोठा भाऊ सतीश दादा माझा भावासम पुतण्या मिलिंद; या सर्वांनी माझे प्रचंड लाड केले. त्यात प्रत्येक गोष्ट हाताशी मिळत होती. त्यामुळे मी थोडा आळशी होत गेलो. तेव्हापासून सतत झोपून राहिल्याने पाठ दुखते. मग बसताना मी वेडावाकडा बसत होतो व आजही कित्येकदा कसाही उठतो_बसतो. मग पाठ अजून जास्त दुखते. माझी मुलगी माझ्यावर कडक लक्ष ठेवून असते. अशा वेळेस ती येऊन मला ओरडते. माझ्या थोड्याफार प्रमाणात का होईना, चालण्यासाठी व मर्यादित व्यायाम करण्यासाठी, ती आग्रही असते. मी तिला आमच्या घरातील हिटलर म्हणतो.
पण ती अत्यंत प्रेमळ आहे. तिला सतत माझी काळजी लागून राहिली असते. माझ्यासाठी ती माझ्या आवडीचे विविध चविष्ट प्रकार बनवत असते. मध्यंतरी माझ्या मनात निराशा प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या मुलीच्या लक्षात आल्यावर तिने माझेच कौन्सिलिंग करायला सुरुवात केली. माझीच वाक्ये मला ऐकवून दाखवत असे. हसत खेळत व मस्करी करत माझ्या मनाला उभारी देत असे. मला खात्री आहे की, तिने जर माझ्या प्रशिक्षण क्षेत्रात प्रवेश केला तर ती माझ्यापेक्षा जास्त यशस्वी व प्रभावी होईल. माझ्या तब्येतीसाठी, तिने स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीत, स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करुन, अनेक कठीण व कडवट निर्णय घेतले आहेत.
❤️ या तिघांना, माझे 'मी, किडनी, डायलिसिस व ट्रान्सप्लांट' हे पुस्तक मी समर्पित करत आहे. ❤️
Comments
Post a Comment