११. अगोदर रोगनिदान करताना चुका; नंतर वैद्यकीय प्रक्रियांमध्ये त्रुटी..

 प्रकरण चार: भाग २

अगोदर रोगनिदान करताना चुका;

नंतर वैद्यकीय प्रक्रियांमध्ये त्रुटी..


२०१८ च्या सुरुवातीलाच मला मुख्य नेफ्रोलॉजिस्ट यांनी, किडनी ट्रान्सप्लांटला मान्यता मिळवण्यासाठीची प्रोसेस सुरु करण्यासाठी लेटर दिले होते. परंतु त्या हॉस्पिटलमध्ये काही सरकारी ऑफिसप्रमाणे, लाल फितीचा कारभार आढळत होता. प्रोसेस अतिशय संथगतीने सुरु होती. काही डॉक्टर्स ज्यांची किडनी ट्रान्सप्लांट साठी परवानगी हवी होती ते वेगळ्या प्रकारे प्रोसेसला वळण देत होते. कोऑर्डिनेटर कधी चांगला डॉक्टर असायचा, तर कधी त्याला बदलून सतत ओरडणारा डॉक्टर असायचा. आम्ही कंटाळून गेलो होतो.


मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे मग सप्टेंबर अखेर डायलिसिस सुरु झाले होते. तेव्हा काही प्रकार घडले. आम्हाला ॲडमिशन हवी होती म्हणून आम्ही मिळेल तो बेड स्विकारला होता. तिथे हेड नर्सने अननुभवी नर्सला आणले व त्रास झाला होता.


नंतर स्पेशल रुममध्ये, मला व कुटुंबियांना, नर्सेस, ब्रदर्स व स्टाफ मेंबर्स; यांचा खूपच चांगला अनुभव आला होता. त्यांच्यामध्ये कमालीचा प्रोफेशलीझम अर्थात व्यावसायिकता  होती.


नंतर मानेमध्ये कॅथेटर बसवण्यासाठी पाच तास लॉबीमध्ये थंडीत कुडकुडत, उपाशीपोटी बसवून ठेवले होते. डायलिसिसच्या पहिल्या दिवशी, पंधरा वर्षे डायलिसिस करत असलेल्या एका फिट माणसाने धीर दिला होता. रुग्णालयात डायलिसिस करण्यासाठी, पेशंटसाठी असलेले बेड चांगलेच मोठे होते. इतर व्यवस्था चांगली होती. डायलिसिस पेशंट यांना डायलिसिस दरम्यान, वेळेनुसार जेवण किंवा नाश्ता दिला जात होता. 


पण त्या सुरुवातीच्या दिवसात, एकदा ट्यूब्स कनेक्ट न झाल्यामुळे, माझी पाठ रक्ताने पूर्णपणे भरली होती. आणि ज्युनियर डॉक्टरच्या मते, ही छोटीशी गोष्ट होती. 


त्यानंतर मला विचारण्यात आले होते की, "पुढील डायलिसिस सेशन्स, मी कुठे करणार?" सदर हॉस्पिटल माझ्या घरापासून दूर असल्यामुळे, आम्ही अगोदरच चौकशी करुन ठेवली होती. त्यानुसार माझ्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर (गाडीने) सुश्रुत हॉस्पिटल आहे, तेथे अपेक्स किडनी सेंटर यांचे चेंबूर सेंटर आहे. त्यावेळी, माहिम मधील रुग्णालयातील मुख्य नेफ्रोलॉजीस्ट व डायलिसिस सेंटरचे प्रमुख या दोघांनीही AKC चेंबूर बद्दल चांगले मत नोंदवले होते. 


दरम्यान माझ्या कॉलेजमधील मित्र संजय संजय राक्षे याने सुश्रुत हॉस्पिटल मधील Apex Kidney Center ला भेट दिली व सगळी चौकशी केली होती. संजयसुद्धा माझा कॉलेजमधील मित्र आहे. आमची मैत्री ३५ वर्षे जुनी आहे. हा माझा असा एक मित्र आहे, जो सगळ्यांच्या पाठीमागे त्यांची स्तुती करतो आणि सतत मित्राच्या मदतीला उभा राहतो.


डायलिसिस साठी माहीम येथील रुग्णालयात असताना, माझ्या डाव्या हातावर फिस्ट्युला सर्जरी केली गेली होती.


आर्टिरिओवेनस Arteriovenous (एव्ही) फिस्टुला शस्त्रक्रिया, डायलिसिस करण्यासाठी, शरीराच्या रक्ताभिसरण प्रणालीत प्रवेश करण्यासाठी, एक जागा तयार करते. एव्ही फिस्टुला रक्त आपल्या शरीरातून डायलिसिस मशीनकडे नेते आणि फिल्टरिंगनंतर परत आपल्या शरीरात आणते.


 एव्ही फिस्टुला शस्त्रक्रियेमध्ये सामान्यत: मनगट किंवा कोपर क्षेत्रामध्ये धमनी आणि एक शिरा एकत्र शिवल्या जातात.  यामध्ये, डायलिसिससाठी आवश्यक असलेल्या, खूप साऱ्या सुई पंक्चर्सला सहन करु शकणारी एक मोठी व कठोर शिरा तयार केली जाते.


या फिस्टुला शस्त्रक्रियेसाठी, मला ऑपरेशन थेटर मध्ये घेण्यात आले. तेथील मुख्य युरोलॉजीस्ट मला भेटायला आले. त्यांनी शस्त्रक्रिया करणारे सीनियर कन्सल्टंट यांची ओळख करून दिली व ते निघून गेले. शस्त्रक्रिया करणारे सिनियर कन्सल्टंट शरीराने उंच व धिप्पाड होते. परंतु मनाने अतिशय चांगले होते. त्यांनी मला शस्त्रक्रिया कशी होणार, हे समजावून सांगितले. 


नंतर मला ऑपरेशन टेबलवर झोपवले गेले. माझा डावा हात एका सपोर्ट वर ठेवला गेला होता आणि मध्ये एक झिरझिरीत पडदा ओढला गेला होता. त्यातून मला सिनियर कन्सल्टंट व त्यांच्याबरोबर बसलेला शिकाऊ डॉक्टर, असे दोघेही दिसत होते.


सिनियर कन्सल्टंट, यांना हवी असलेली सगळी साधनसामुग्री, तेथील नर्स व ब्रदर यांनी आणून दिली. मला त्यांनी डाव्या हातावर लोकल अनेस्थेशिया दिला व तेथे त्यांनी उपलब्ध असलेल्या म्युझिक सिस्टिम वर त्यांनी गाणी लावली होती. माझे ऑपरेशन सुरु झाले होते, तेव्हा मला कोणतीच जाणीव होत नव्हती. 


माझा हात बारीक असल्यामुळे, माझ्या हातातील धमनी व शीर, दोन्ही बारीक होते. म्हणून त्यांना एकत्र शिवण्यात वेळ जात होता. मला हळूहळू माझ्या डाव्या हातावर, ज्या भागात ऑपरेशन सुरु होते, तिथे हलक्या का होईना, वेदना जाणवायला लागल्या होत्या. मी डॉक्टरना अर्थात सिनियर कन्सल्टंट यांना सांगताच, त्यांनी 'नर्स' व 'ब्रदर' यांना हाका मारायला सुरुवात केली. परंतु खूप वेळ झाला तरी कोणाचा पत्ता नव्हता. कुणीही जागेवर नव्हते.


माझ्या लक्षात येत चालले होते की, वेळ झाल्यामुळे (अर्थात माझ्या हातातील धमनी व शीर बारीक असल्यामुळे) अनेस्थेशिया चा प्रभाव कमी होत चालला होता. त्यामुळे हळूहळू वेदनांच्या तीव्रतेमध्ये वाढ होत चालली होती. त्यावेळी मी रॅम्बो चित्रपटाची आठवला. त्यामध्ये सिल्वेस्टर स्टॅलोन हा स्वतःची जखम कोणत्याही अनेस्थेशिया शिवाय उपलब्ध साधनांनी शिवत असतो. सिनियर कन्सल्टंट यांनीसुद्धा मला बोलण्यात गुंतवून ठेवले. मी त्यांच्याशी बोलता बोलता, गाणी गुणगुणत होतो; जेणेकरून माझे लक्ष दुसरीकडे वेधले जाईल. सीनियर कन्सल्टंटनी, त्यांचे सर्व कौशल्य वापरुन लवकरात लवकर ते ऑपरेशन पूर्ण केले.


त्यानंतर तेथे ऑपरेशन वॉर्डच्या हेड नर्स मला भेटल्या होत्या. मी त्यांना ऑपरेशन दरम्यान एकही नर्स वा ब्रदर उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या स्टाफची बाजू घेताना, सर्व तेथेच होते, असे सांगितले. 


जेव्हा कारणाच्या नावाखाली सबब दिली जाते, तेव्हा चर्चा होत नाही तर वाद होतात. 


म्हणून मी अधिक काही न बोलता, मला परत माझ्या रुम मध्ये नेण्याची विनंती केली. मला परत माझ्या रूममध्ये नेण्यासाठी आलेले ब्रदर व नर्स हे दोघे एकमेकांशी चर्चा करू लागले. पहिला प्रश्न होता, "याला कुठे न्यायचं आहे?" 


मी दोघांनाही प्रश्न केला, "तुमच्या दोघांचं वय काय आहे?" 


तेव्हा त्यांनी विचारले, "कशासाठी?" 


मी त्यांना समजावून सांगितले, "मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे व तुम्ही मला अरे तुरे करत आहात." 


तेव्हा दोघांनी निर्विकारपणे सांगितले, "येथे अशाच रीतीने बोलले जाते." 


मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. 


परत माझ्या रुममध्ये आल्यानंतर, काही वेळानंतर मुख्य यूरोलॉजिस्ट मला भेटायला आले होते. मी त्यांना झाल्या प्रकाराबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमाने "मी चौकशी करतो." असे आश्वासन दिले. मी व माझे कुटुंबीय खुश झालो होतो. नंतर कळले की त्यांच्या 'विझिट फी' साठी ही भेट होती. त्या प्रकाराबद्दल नंतर पुढे काहीच झाले नाही.


मला ७ ऑक्टोबर २०१८ रोजी त्या माहिम मधील त्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला व ९ ऑक्टोबर पासून, मंगळवारपासून माझे AKC चेंबूर येथे डायलिसिस सुरु झाले होते. आठवड्यातून तीन दिवस, अर्थात मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस डायलिसिस सुरु झाले. प्रत्येक डायलिसिस हे पावणे चार तास असायचे. येथील सव्वा दोन वर्षे, चाललेल्या डायलिसिस सेशन्स मध्ये, काही अपवाद वगळता, मला खूप चांगले अनुभव आले.


डायलिसिस ते ट्रान्सप्लांट मधील अनुभव कथनाला पुढच्या भागापासून सुरुवात करु या..


क्रमशः


आपलाच,

बिपिन मयेकर

Comments

Popular posts from this blog

विशेष विनंती:

प्रस्तावना

३. फ्लॅशबॅक