१०. कधीच ' नाही'पेक्षा उशीरा पाऊल उचललेले चांगले!

प्रकरण तीन

Better late than never..


भाग १

आपल्या आलेल्या सूचनांचा मान ठेवत, मी २०११ ते २०१८ पर्यंतचा, अर्थात डायलिसिस सुरु होईपर्यंतचा वैद्यकीय प्रवास लिहिण्यास सुरुवात करत आहे.


मी सुरुवात तारखेनुसार केली, पण कित्येक डझन्स मेडिकल फाईल्स व शेकडो मेडिकल टेस्टचे रिपोर्ट्स आहेत. त्यात तारखा शोधून लिहिण्यात वेळ जाऊ लागला. म्हणून मी ठरवले की जेवढे आठवते आहे तेवढे अगोदर लिहून काढू या. आणि नंतर जेव्हा कागदोपत्री पुस्तक प्रसिद्ध करायची वेळ येईल, तोपर्यंत योग्य तारखा शोधून त्या पुस्तकात नमूद करू या.


२००४ मध्ये माझा creatinine हा १.४ होता. मला कल्पना सुद्धा नव्हती, creatinine म्हणजे काय आहे आहे? तरीसुद्धा माझा नियमित योगा व व्यायाम आणि थोडेफार डायटिंग; यामुळे creatinine, २०११ पर्यंत १.५ होता. ही योग्य वेळ होती, Nephrologist ना भेट देण्याची.. पण Nephrology हा प्रकार सुद्धा माहित नव्हता. डॉक्टरांनी ही फक्त ब्लडप्रेशर च्या गोळ्या चालू ठेवल्या होत्या.


२ नोव्हेंबर २०११ पासून माझ्या डॉक्टरानी (जनरल प्रॅक्टिशनर) 'नेफरोसेव' ही एकमेव, creatinine वरील उपायासाठी, गोळी सुरु केली.


२१ नोव्हेंबर २०११ ला creatinine हा २.४० पर्यंत जाऊन पोहोचला. तरीही औषधांमध्ये काही फरक केला गेला नाही. सर्व ब्लड प्रेशर च्या गोळ्या व एकमेव Nephrosave ही गोळी सुरु होती.


७ एप्रिल २०१२ मध्ये creatinine हा २.१५ इतका थोडा खाली आला. तरीही ती धोकादायक स्थिती होती. तरीही तीच औषधे सुरू ठेवली गेली. आणि आम्हाला त्या उंबरठ्यावर नेफरोलॉजिस्ट ची भेट घेण्यास सांगण्यात आले.


मग आम्ही माहीम येथील प्रथितयश रुग्णालयात, नामवंत महिला नेफ्रोलॉजिस्ट यांची भेट घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मग में २०१२ मध्ये, Cardiologist व Pathologist यांची भेट घेतली. १४ च्या वर असलेली, माझी हिमोग्लोबिन लेवल ६.८ पर्यंतखाली आली होती. त्यामुळे थकवा वाढला होता.


त्यानंतर नेफरोलॉजिस्ट यांनी खूप साऱ्या पॅथॉलॉजी टेस्ट करायला सांगितल्या.


18 मे 2012 रोजी नेफरोलॉजिस्ट यांनी USG: Abdomen and Pelvis टेस्ट करावयास सांगितली.


माझ्या माहितीप्रमाणे,

पेल्विक अल्ट्रासाऊंड ध्वनी लहरी संक्रमित करणारे ट्रान्सड्यूसर नावाचे डिव्हाइस वापरते.  या ध्वनी लाटा आपल्या अवयवांना आणि टिश्यूनवर आदळतात आणि नंतर ट्रान्सड्यूसरपर्यंत प्रतिध्वनी करतात.  एक संगणक, ध्वनी लहरींना, आपल्या अवयवांच्या चित्रात रूपांतरित करतो, जे चित्र व्हिडिओ स्क्रीनवर दिसते.


 रिपोर्टनुसार, माझे मूत्राशय आतून सुजलेले होते व तेथे पोकळी जाणवत होती.


यानंतरही होत्या त्या अवस्थेत, मी भारतभर फिरत, माझे ट्रेनिंग प्रोजेक्ट्स पूर्ण करत होतो. तसेच मुंबई विद्यापीठात, माझे इतर ट्रेनिंग प्रोग्राम्स सुरु होते. काही वेळेला ब्लडप्रेशर हे थोडे जास्त असे. पण मी त्याचा कधी बाऊ केला नाही आणि आपले काम इमानेइतबारे करत राहिलो. कॉर्पोरेट कंपनीज मध्ये किंवा प्रसन्न प्रशिक्षणक्रमामध्ये कोणालाही कल्पना नव्हती की माझ्या बाबतीत काय चालले आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने मी माझे काम व्यवस्थित करू शकलो.


दर महिन्याला किंवा कित्येकदा काही दिवसात ओपीडीच्या भेटी सुरू होत्या. ओपीडी मध्ये जाऊन नेफरोलॉजिस्ट यांना भेटणे सुरु होते. त्यांची औषधे सुद्धा सुद्धा सुरु झाली होती. पण हळूहळू creatinine वाढत होते. पाचवर गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कल्पना दिली होती की, आता कधीही डायलिसिस सुरु करावे लागेल. 


ते ऐकल्यावर मी व माझ्या कुटुंबाने डायलिसिस टाळण्यासाठी, शक्य तेवढे सर्व प्रयत्न करायला सुरुवात केली. डायट, योगा व व्यायाम यांचे कॉम्बिनेशन व्यवस्थित सुरु ठेवले. त्यामुळे पुढे तीन वर्षापर्यंत मला डायलिसिस टाळता आले.


ऑक्टोबर २०१५ मध्ये माझा Serum Creatinine हा ५.५ पर्यंत वाढला होता. 


२६ नोव्हेंबर २०२५, रोजी माझ्या काही महत्त्वाच्या प्रोसीजर्स झाल्या त्याच्यामध्ये खास करुन USG Guided Pleural Tap  ही महत्त्वाची प्रोसिजर होती. आमचे कौटुंबिक मित्र, डॉक्टर जयंत नाडकर्णी यांनी आम्हाला सावध केले होते की, छातीतून पाणी काढण्याच्या या प्रोसिजर मध्ये योग्य डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक आहे.


प्रत्यक्ष टेस्टच्या वेळी, दोन तरुण डॉक्टर्स; एक पुरुष व एक महिला उपस्थित होते. त्यांनी माझ्याशी अगोदर व्यवस्थित चर्चा केली. मला रिलॅक्स केले. आणि प्रोसिजरला सुरुवात केली. पाठीमागून भल्यामोठ्या सुया टोचण्यापूर्वी त्यांनी लोकल अनेस्थेशिया इंजेक्ट केला होता. जास्त त्रास न होता, त्यांनी छातीमध्ये असलेले पाणी काढून घेतले. नंतर त्यावर विविध परिक्षणे होऊन त्याचे रिपोर्ट झाले. त्यामध्ये एमटीबी डिटेक्ट झाला नाही, असे नमूद करण्यात आले होते. वेगवेगळ्या डॉक्टर्स चे वेगवेगळ्या स्वरूपाचे रिपोर्ट होते. पण कुठेही गंभीर काहीही आढळले नाही.


१ डिसेंबर २०१५, रोजी येथील एक प्रमुख डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट यांनी आम्हाला परत एकदा Pleural Tapping करायला सांगितले. आम्ही त्यांना "तुम्ही उपस्थित असणार ना?" असे विचारले. त्यावर त्यांनी "हो निश्चित!" असे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पेमेंट करुन, Pleural Tapping साठी गेलो तेव्हा तिथे मिसरुड ही न फुटलेला, एक अत्यंत तरुण डॉक्टर उपस्थित होता. ती माझी टेस्ट अगोदर झाल्यामुळे मी थोडा निर्धास्त होतो. त्या तरुण डॉक्टरला मी विचारले की, "मुख्य डॉक्टर कधी येणार?" तेव्हा त्याने उत्तर दिले, "ते ओपीडी मध्ये बिझी आहेत. त्यामुळे ही टेस्ट मीच करणार आहे." 


तेव्हा मी थोडा घाबरलो. पण तेथे उपस्थित नर्सेसनी मला आश्वस्त केले. लोकल अनेस्थेशिया दिल्यानंतर, माझ्या पाठीत, जेव्हा त्या अननुभवी डॉक्टरने सुई टोचली, तेव्हा छाती जोरात कळ गेली. मी जोरात ओरडलो, तेव्हा तेथे उपस्थित नर्सेस व तो तरुण डॉक्टर, सर्व घाबरले. 


त्यांनी मला विचारले, "तुम्ही नाष्टा केला आहे ना?" मी कळवळत बोललो, "मला काल कल्पना दिल्यामुळे मी व्यवस्थित नाश्ता करून आलो आहे." 


त्यावर, तो तरुण डॉक्टर बोलला, "मी सुई बदलतो." त्याने दुसरी सुई घेतली. मी एका छोट्या टेबलवर, स्ट्रेचरला धरुन बसलो होतो. त्याने दुसरी सुई पाठीतून छातीमध्ये टाकताच, माझ्या छातीत इतकी प्रचंड कळ गेली की, मी तिकडे जागेवरच बेशुद्ध झालो. त्या अवस्थेत  मला स्ट्रेचरवर ठेवण्यात आले. 


मला हळूहळू शुद्ध येत होती. तेव्हा मी बघितले, तेथे एक सिनियर डॉक्टर आला होता, जो त्या तरुण अननुभवी डॉक्टरपेक्षा काही वर्षांनी मोठा होता. तो अननुभवी तरुण डॉक्टर त्याला परिस्थिती सांगत होता. 


तरुण डॉक्टरने, जेव्हा त्याला दोन्ही सुया दाखवल्या. तेव्हा त्या सिनियर डॉक्टरने कपाळावर हात मारला, आणि विचारले "तू अगोदर कोणाला विचारले होतेस का, की या सुया वापरायच्या म्हणून?" 


तेव्हा तरुण डॉक्टरने घाबरुन "नाही. मला त्या सुया योग्य वाटल्या." असे सांगितले. मला मग काही इंजेक्शन देण्यात आली व नंतर मला बाजूच्या एका रुममध्ये स्ट्रेचरवर ठेवूनच लपवण्यात आले. 


बाहेर थांबलेली माझी पत्नी सुप्रिया, मुलगी निहारिका व लहान भाऊ सचिन, हे तिघेही सारखे माझ्याबद्दल चौकशी करत होते. खूप वेळ झाला तरीही मी बाहेर येत नाही, हे बघून तिघेही रागावले होते. 


माझ्या पत्नीला सगळे अडवत होते, पण शेवटी ती जबरदस्ती आतमध्ये आली. तेव्हा त्यांना तिला, मला जिथे लपवले होते, त्या रुममध्ये आणावे लागले.


तोपर्यंत मला शुद्ध आलेली होती. मग मी तिला काय घडले, हे सविस्तर सांगितले. तेव्हा ती रागारागात खाली गेली व मुख्य डॉक्टरांना झालेल्या प्रकाराबद्दल विचारले. ते अनुभवी डॉक्टर उलट तिच्यावरच रागावले.


मला नंतर माझ्या ओळखीच्या काही डॉक्टर्स कडून समजले की, सदर वरिष्ठ डॉक्टरांनी त्या सर्वांना, शिकवले होते. त्या सगळ्यांनी आश्चर्य  व्यक्त केले होते.


आम्ही असह्य होऊन व असहाय्य होऊन, मुख्य नेफरोलॉजिस्ट यांना जाऊन भेटलो. पण ते सुद्धा असहाय्य दिसत होते. मग मला खालच्या मजल्यावर जाऊन एक्स-रे करायला सांगितले. 


लिफ्ट मध्ये शिरलो, तेव्हा माझ्या कुटुंबियांनी, मी पडू नये म्हणून, मला पकडून ठेवले होते. माझी अवस्था बघून लिफ्टमनने विचारले की, "यांना व्हीलचेअर कशासाठी दिली नाही." आमचे उत्तर होते, "कल्पना नाही." तेव्हा त्या भल्या माणसाने लिफ्ट थांबवून ठेवली. एका स्टाफला बोलावले, व्हीलचेयर घेऊन आणि मला व्हीलचेअरवर नीट बसल्यानंतर त्याने लिफ्ट सुरु केली. 


तेथील सर्व लिफ्टमन यांचा अनुभव खूपच चांगला होता. मी विचार करत होतो की तेथील काही डॉक्टर्स, हे पण जर त्या लिफ्टमन प्रमाणे, सावध असते तर, किती चांगलं झालं असतं! 


तरीही आम्ही त्या हॉस्पिटलची ट्रिटमेंट सुरु ठेवली. कारण तेथील प्रमुख नेफरोलॉजिस्ट, हे देवदूताप्रमाणे कार्य करत होते. आम्ही त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेत आहोत, हे कळताच अनेक जणांनी आम्हाला त्यांच्याबद्दल खूपच चांगले सांगितले होते.


२०१५ ते २०१८, यादरम्यान परत एकदा ४० ते ५० ओपीडी भेटी तसेच शेकडो टेस्ट्स सुरु होत्या.  त्याबरोबरीने माझे व्यावसायिक व सामाजिक कार्य सुद्धा सुरु होते.


आपलाच,

बिपिन मयेकर

myself.bipin@yahoo.co.in


Comments

Popular posts from this blog

विशेष विनंती:

प्रस्तावना

३. फ्लॅशबॅक